मुंबई : ५०० आणि एक हजार रुपयांच्या नोटा बंद होऊन एक वर्ष झालं आहे. नोटबंदीच्या वर्षपूर्तीला याचा फायदा झाल्याचा दावा भाजप करतंय तर नोटबंदीमुळे अर्थव्यवस्था डबघाईला आल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. या सगळ्या आरोप-प्रत्यारोपांमध्ये जुन्या नोटांचं नेमकं काय झालं हा प्रश्न विचारला गेला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बंद करण्यात आलेल्या ५०० आणि हजारच्या नोटा दक्षिण आफ्रिकेला पाठवण्यात येत आहेत. दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या निवडणुकीच्या प्रचारासाठी या नोटा वापरण्यात येणार आहेत. रिजर्व्ह बँक आणि केरळमधल्या कन्नूरच्या कंपनीसोबत झालेल्या करारामुळे या नोटा आफ्रिकेला पाठवण्यात येणार आहेत.


५०० आणि एक हजार रुपयांच्या नोटांचा लगदा लाकडासोबत एकत्र करून हार्डबोर्ड तयार करण्यात येणार आहे. या हार्डबोर्डचा वापर दक्षिण आफ्रिकेतल्या निवडणुकांचे बॅनर बनवण्यासाठी होणार आहे. आफ्रिकेमध्ये २०१९साली निवडणुका होणार आहेत.


रिजर्व्ह बँकेनं मागितली होती मदत


नोटबंदीनंतर जमा झालेल्या ५०० आणि हजार रुपयांच्या नोटांचं काय करायचं असा प्रश्न आरबीआयला पडला होता. या नोटा जाळल्या तर त्यामुळे पर्यावरणाचं मोठं नुकसान होणार होतं, म्हणून आरबीआयनं तिरुअनंतपुरमच्या वेस्टर्न इंडिया प्लायवूड लिमिटेडशी संपर्क साधला. यानंतर कंपनीनं आरबीआयला सॅम्पल नोटा पाठवायला सांगितल्या.


या नोटांचा पल्प बनवून त्याला रिफायनरमध्ये टाकण्यात आलं. या पल्पला वूड पल्पमध्ये एकत्र करण्यात आलं. या दोन्ही पल्पचं मिळून हार्डबोर्ड बनवण्यात आले, अशी माहिती कंपनीचे जनरल मॅनेजर टी.एम.बावा यांनी इंडियन एक्सप्रेसला दिली आहे.


७५० टन नोटा रिसायकल


वेस्टन इंडिया कंपनीनं ५० ट्रेलर्स म्हणजेच ७५० टन नोटा रिसायकल केल्या. कंपनीनं १२८ रुपये प्रती टनच्या हिशोबानं या नोटा आरबीआयकडून विकत घेतल्या.


नोटांपासून बनलेल्या हार्डबोर्डला चांगली किंमत


नोटांपासून बनवलेल्या हार्डबोर्डची गुणवत्ता चांगली असते. तसंच हे हार्डबोर्ड वेगळे दिसतात आणि जास्त किंमतीला विकले जातात, असा दावा बावा यांनी केला आहे. वेस्टर्न इंडिया कंपनी पहिल्यांदाच नोटांच्या पल्पपासून बनवलेले हार्डबोर्ड दक्षिण आफ्रिकेमध्ये निर्यात करत आहे.