नवी दिल्ली - देशातील सर्वाधिक लांबीच्या रस्ता-रेल्वे पुलाचे मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उदघाटन झाले. आसाममधील डिब्रुगढ येथील या पुलाच्या कामावरून आणि त्याच्या वैशिष्ट्यांवरून अनेकांनी सरकारचे कौतुक केले असले. तरी माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांनी मात्र यावरून नाराजी व्यक्त केली. या पुलाच्या कामाचे भूमिपूजन तत्कालीन पंतप्रधान देवेगौडा यांच्या हस्ते झाले होते. पण पूलाचे बांधकाम पूर्ण झाल्यावर त्याच्या उदघाटनाच्या कार्यक्रमाचे निमंत्रणही न देण्यात आल्यामुळे देवेगौडा यांनी नाराजी व्यक्त केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१९९७ साली देवेगौडा पंतप्रधान असताना या पुलाच्या बांधकामाची सुरुवात झाली होती. देवेगौडा यांच्या हस्तेच भूमिपूजन करण्यात आले होते. मंगळवारी या पुलाचे उदघाटन आणि लोकार्पण करण्यात आले. देवेगौडांना मात्र कार्यक्रमाला निमंत्रित करण्यात आले नाही. 


देवेगौडा म्हणाले, काश्मीरसाठी रेल्वेमार्ग, दिल्ली मेट्रो आणि बोगीबील रस्ता-रेल्वे पूल या प्रकल्पांना मी पंतप्रधान असताना मंजुरी देण्यात आली होती. या तिन्ही प्रकल्पांसाठी सुरुवातीच्या काळात प्रत्येकी १०० कोटी रुपयांची तरतूदही अर्थसंकल्पात करण्यात आली होती. प्रकल्पांचे भूमिपूजनही मीच केले होते. पण लोकांना आता आमचा विसर पडला आहे.


तुम्हाला उदघाटनाच्या कार्यक्रमाचे निमंत्रण मिळाले होते का, असा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यावर देवेगौडा म्हणाले की, अय्यो रामा, मला कोण लक्षात ठेवणार? काही वृत्तपत्रांनी फक्त याचा उल्लेख केला आहे. ब्रह्मपुत्रा नदीवर बांधण्यात आलेला हा पूल ४.९ किलोमीटर लांबीचा आहे.  पूल बांधण्यासाठी ५ हजार ९०० कोटींचा खर्च आला आहे. लष्करासाठी हा पूल अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. चीनच्या सीमेवर तैनात असलेल्या लष्करासाठी साधनसामुग्री पोहोचवण्यासाठी या पुलाचा उपयोग होणार आहे.