नवी दिल्ली: महाराष्ट्रात लवकरात लवकर नव्या सरकारची स्थापन होणे गरजेचे आहे. ते नक्की स्थापन होईल, याबाबत आम्ही पूर्णपणे आश्वस्त असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. देवेंद्र फडणवीस यांनी आज केंद्रीय मंत्री अमित शहा यांची भेट घेतली. यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांना महाराष्ट्रातील सत्तास्थापनेविषयी विचारण्यात आले. यावर त्यांनी म्हटले की, सत्तेच्या समीकरणाबाबत कोण काय बोलत आहे, यावर मी किंवा भाजपमधून कोणीही प्रतिक्रिया देणार नाही. मात्र, आम्ही सरकार स्थापनेबाबत पूर्णपणे आश्वस्त असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. याशिवाय, शिवसेना आणि भाजपमधील सत्तावाटपाच्या वादावर बोलण्यास फडणवीस यांनी स्पष्टपणे नकार दिला. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज अमित शहा यांच्यासोबत झालेली बैठक ही त्यांना महाराष्ट्रात अवकाळी पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची माहिती देण्यासाठी होती. यावेळी मी अमित शहा यांना राज्यातील परिस्थितीविषयी सखोल माहिती दिली. अनेक जिल्ह्यांमध्ये पिकांचे १०० टक्के नुकसान झाले आहे. त्यामुळे केंद्र सरकारकडून अतिरिक्त मदत मिळावी, अशी विनंती मी त्यांना केली. यानंतर अमित शहा यांनी विविध सचिवांशी बोलणी केली. केंद्राची पथके लवकरात लवकर महाराष्ट्रात पाठवण्यात येतील. तसेच शेतकऱ्यांना विम्याची रक्कम लवकरात लवकर मिळावी, यासाठी आपण स्वत: विमा कंपन्यांच्या अधिकाऱ्यांशी बोलू, असे आश्वासनही अमित शहा यांनी दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.


विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर शिवसेनेने समसमान सत्तावाटपासाठी आग्रह धरला होता. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमच्यात अशी कोणतीही बोलणी झाली नव्हती, असे सांगत शिवसेनेची मागणी धुडकावून लावली होती. यानंतर शिवसेना कमालीची आक्रमक झाली. संजय राऊत यांनी गेल्या काही दिवसांपासून पत्रकारपरिषद आणि ट्विट करण्याचा सपाटा लावला असून ते दररोज भाजपला नवनवे इशारे देत आहेत. कालच झालेल्या पत्रकारपरिषदेत त्यांनी शिवसेनेकडे १७० पेक्षा अधिक आमदारांचे संख्याबळ असल्याचा दावा केला होता. आज दिल्लीत महत्त्वाच्या राजकीय बैठका होत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील सत्तास्थापनेचा तिढा सुटणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.