नवी दिल्ली : तुम्ही विमानाने प्रवास करत असताना नेहमीच इंग्रजी मासिके, वर्तमानपत्र हातात पडतात. मात्र, यापुढे आता तुमच्या हातात किंवा वाचायला हिंदी मासिके आणि वर्तमानपत्र मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशातील विमान कंपन्यांना विमानांमध्ये इंग्रजी भाषेसोबत हिंदी वर्तमानपत्रे आणि मासिके उपलब्ध करून देणे सक्तीचे करण्यात आले आहे. नागरी विमानवाहतूक महासंचालनालयाने(डीजीसीए) सर्व विमान कंपन्यांना प्रवाशांसाठी हिंदी वर्तमानपत्रे आणि मासिके उपलब्ध करून देण्याचे आदेश दिलेत. 


विमानात हिंदी भाषेतील वाचन साहित्य उपलब्ध करून न देणे, हे अधिकृत भाषेसाठी तयार करण्यात आलेल्या सरकारी धोरणाचे उल्लंघन ठरेल, असा इशारा डीजीसीएचे सह महासंचालक ललित गुप्ता यांनी सर्व विमान कंपन्यांना याबाबत एक पत्र पाठवताना दिलाय.


प्रवाशांना  हिंदी वर्तमानपत्रे आणि मासिके उपलब्ध होतायेत की नाही हे सुनिश्चित करण्यासाठी डीजीसीएने सर्व विमानकंपन्यांना नोटीस जारी केली आहे. 


दरम्यान, काँग्रेसचे नेते शशी थरूर यांनी सरकारच्या या निर्णयाची खिल्ली उडवली आहे. आता विमानांमध्ये शाकाहारी पदार्थांबरोबर हिंदी मासिके वाचायला देण्याचा ‘डीजीसीए’चा विचार आहे का, असे खोचक ट्विट त्यांनी केले.


तर दुसरीकडे डीजीसीएच्या एका माजी अधिकाऱ्यानेही या निर्णयावर ताशेरे ओढले आहेत. हा निर्णय पूर्णपणे निरर्थक आहे. डीजीसीए ही सुरक्षा नियामक संस्था आहे. त्यामुळे अशाप्रकारच्या निर्णयांशी त्यांचे काहीही देणेघेणे नाही.