DGCA On International Flights : नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) 15 डिसेंबरपासून सुरू होणारी नियमित आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरु करण्याचा निर्णय लांबणीवर टाकला आहे. 26 नोव्हेंबरला नागरी उड्डाण मंत्रालयाने आंतरराष्ट्रीय विमानसेवा 15 डिसेंबरपासून सुरु करण्याची घोषणा केली होती. पण कोरोना विषाणूचा नवीन प्रकार, ओमायक्रॉनचा धोका लक्षात घेता, हा निर्णय काही काळासाठी पुढे ढकलण्यात आला आहे. नवीन तारखा नंतर जाहीर केल्या जातील.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोविड-19 महामारीमुळे 23 मार्च 2020 पासून भारतातून येणारी आणि जाणारी सर्व आंतरराष्ट्रीय उड्डाणे बंद आहेत. गेल्या वर्षी जुलैपासून सुमारे 28 देशांसोबत एअर बबल करारांतर्गत विशेष आंतरराष्ट्रीय प्रवासी उड्डाणे सुरू आहेत.


ओमायक्रॉनचा धोका
कोरोना विषाणूच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटने जगभरात एक नवीन भीती निर्माण केली आहे. WHO ने या प्रकाराला 'वेरिएंट ऑफ कन्सर्न' असं संबोधले आहे तसंच सर्व देशांना सावध राहण्यास सांगितलं आहे. भारतानेही याबाबत कठोर उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. एअर बबल अंतर्गत जारी केलेल्या फ्लाइट्सबाबत नवीन मार्गदर्शक तत्त्वेही जारी करण्यात आली आहेत. याशिवाय जे देश धोक्याच्या श्रेणीत येतात, त्या देशांतून येणाऱ्या प्रवाशांबाबत अधिक काळजी घेण्यास सांगण्यात आलं आहे.


ओमायक्रॉनचा किती धोकादायक?
ओमायक्रॉन व्हेरिएंट प्रथम दक्षिण आफ्रिकेत आढळून आला त्यानंतर आतापर्यंत 22 देशांमध्ये त्याची प्रकरणं नोंदवली गेली आहेत. आतापर्यंत केलेल्या संशोधनानुसार, नवीन व्हेरिएंट डेल्टा आणि कोरोनाच्या इतर प्रकारांपेक्षा खूपच वेगळा आहे. यामध्ये अनेक बदल दिसून आले आहेत. हा विषाणू अधिक वेगाने पसरू शकतो असा तज्ज्ञांचा दावा आहे.