साडेचार वर्षात मी एकदाही सुट्टी घेतली का?- मोदी
काँग्रेसला सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा हवा होता.
भिलवाडा: गेल्या साडेचार वर्षात मी घेतलेल्या प्रत्येक निर्णयाचा आणि कामाचा हिशेब जनतेला दिल्याचे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. ते सोमवारी राजस्थानच्या भिलवाडा येथील प्रचारसभेत बोलत होते. यावेळी पंतप्रधान मोदींनी जनतेला भावनिक साद घालण्याचा प्रयत्न केला. त्यांनी म्हटले की, गेल्या साडेचार वर्षात मी एकदाही सुट्टी घेतल्याचे तुम्ही ऐकले आहे का? मी आराम करण्यासाठी कुठे गेलो किंवा आठवडाभर कोणालाही दिसलोच नाही, असेतरी कधी झाले आहे का?, असा सवाल मोदींनी जनतेला विचारला.
यावेळी त्यांनी २६/११ च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यास १० वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षावर टीकास्त्रही सोडले.
२६/११ ला मुंबईत दहशतवाद्यांनी हल्ला करुन निष्पाप लोकांचे आणि जवानांची हत्या केली. या घटनेला १० वर्षे पूर्ण झाली, असे त्यांनी सांगितले. या हल्ल्याने जग हादरले होते आणि काँग्रेस त्यामध्येही निवडणुकीचा खेळ खेळत होती. काँग्रेसचे नेते त्यावेळी इतरांना देशभक्तीचे धडे देत होते. मात्र, जेव्हा भारतीय लष्कराने सर्जिकल स्ट्राईक केला तेव्हा याचा काँग्रेसने त्याविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांनी सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागितला. मात्र, भारतीय जवाना सर्जिकल स्ट्राईक करताना व्हीडिओ कॅमेरा घेऊन जाणार का, असा सवाल मोदी यांनी विचारला.