`हातपाय तोडले की समजेल....`; `आदिपुरुष`वरुन ओम राऊत यांना अयोध्येतील महंतांची धमकी
Adipurush Controversy : अभिनेता प्रभास आणि क्रिती सेनॉनचा `आदिपुरुष` चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. चित्रपट येताच ओम राऊत आणि मनोज मुंतशीर हे विरोधकांच्या निशाण्यावर आले आहेत. चित्रपटातल्या प्रसंगांवरुन आदिपुरुषवर जोरदार टीका केली जात आहे. अशातच अयोध्येतल्या महंतांनी थेट निर्माते आणि दिग्दर्शकांना मारण्याची भाषा केली आहे.
Adipurush Controversy : ओम राऊत (Om Raut) दिग्दर्शित आदिपुरुष हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. चित्रपटात दाखवलेल्या काही प्रसंगामुळे आणि संवादांमुळे अनेक ठिकाणी यावर बंदी घालण्याची मागणी करण्यात येत आहे. बऱ्याच आक्षेपानंतर सेन्सॉर बोर्डाने (censor board) ओम राऊत यांच्या आदिपुरुष चित्रपटातील काही संवाद काढून टाकले आहेत. मात्र तरीही वाद शमण्याची चिन्हे नाहीत. अशातच अयोध्येतील एका महंतांनी थेट या चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्मात्यांचे हात पाय तोडायला हवेत असा इशारा दिला आहे. तसेच या चित्रपटावर देशभरात बंदी आणायला हवी अशीही मागणी महंतांनी केली आहे.
उत्तर प्रदेशच्या इटावा येथील नुमाईश पंडालमध्ये आयोजित रामायण कॉन्क्लेव्हमध्ये आलेल्या अयोध्येच्या महंत जयराम दास यांनी आदिपुरुष या चित्रपटावर जोरदार टीका केली आहे. या चित्रपटाचे नावच चुकीचे आहे. चित्रपटाचे नाव आदिपुरुष नाही तर अनादिपुरुष असायला हवे. भगवान रामचंद्र हे आदि नसून अनादि आहेत, असे महंत जयराम दास यांनी म्हटलं आहे.
"आदिपुरुष हा शब्दच चुकीचा आहे. या चित्रपटाचा सगेळच विरोध करत आहेत. या चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक हे उजव्या विचारसरणीचे आहेत. या चित्रपटातील संवाद देखील चुकीचे आहेत. जानकी देवी पूर्ण वस्त्रांमध्ये नाहीत. या लोकांनी आमच्या सनातन धर्मावर घात केला आहे. आपल्या देशातील गद्दार आदिपुरुष सारखे चित्रपट तयार करुन समाजाला तोडत आहेत. अशा लोकांचा मी विरोध करतो. कुणीहा हा चित्रपट पाहायला जावू नका. चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शकांचे हात पाय तोडण्याची गरज आहे. यांना रस्त्यावर पळवून पळवून मारायला हवं. यांचे हातपाय तोडले की यांना समजेल की हिंदू सुद्धा कट्टर असतात. आदिपुरुष चित्रपट बनवणारे सनातन धर्माचा विरोध करणारे आहेत. त्यांना माफी मागायला हवी आणि चित्रपटावर बंदी आणायला हवी. साधू, संत या चित्रपटाच्या विरोधात आवाज उठवत आहेत. भारतात राहणारे लोक धर्मप्रचारक आहेत. भारतातल्या संस्कृतीचे रक्षण करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे," असे महंत जयराम दास यांनी म्हटलं आहे.
आदिपुरुष चित्रपटाला महाराष्ट्रातही विरोध
'आदिपुरुष' चित्रपटातील काही सीन, संवाद आणि कलाकारांचे लूक याला प्रेक्षकांनी कडाडून विरोध केला आहे. भगवान श्रीराम आणि रामायणाबाबत अनेक चुकीच्या गोष्टी चित्रपटात दाखवल्याचा आरोप चित्रपटाच्या निर्मात्यांवर होत आहे. अशातच पालघरमध्ये एका थिएटरमध्ये सुरु असलेला चित्रपट बंद पाडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. "तुम्ही तुमच्या मुलांना या गोष्टी शिकवणार का? आम्ही आमच्या देवाचा अपमान सहन करु शकत नाही. आमच्या देवी-देवतांचा अपमान करणाऱ्यांचा आम्ही निषेध करू. आम्हाला फासावर चढावं लागलं तर तेही करु पण अपमान सहन करणार नाही, असं म्हणत या लोकांनी गोंधळ घातला आहे," असे गोंधळ घालणाऱ्यांनी म्हटलं आहे.