UP Crime : उत्तर प्रदेशातून (UP News) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशच्या देवरियामध्ये एका दिव्यांगाला पोलिसांनी (UP Police) बेदम मारहाण केल्याचे समोर आले आहे. या घटनेचा एक व्हिडीओ देखील समोर आला आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये (Viral Video) उत्तर प्रदेश पोलीस दलाचे दोन कर्मचारी एका दिव्यांग तरुणाला मारहाण करताना दिसत आहेत. मारहाण झालेली व्यक्ती त्याची ट्रायसायकल घेऊन जात असताना पोलिसांनी त्याला मारहाण करण्यात आली आहे. ती व्यक्ती तिथून जात असताना दोन्ही पोलिसांनी त्याला पुन्हा पकडून मारहाण केली. आपण पोलिसांकडे फक्त पाणी मागत होतो, असे पीडित तरुणाचे म्हणणे आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लोकांनी सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खाकीचे गणवेशाचे आणखी एक रूप उत्तर प्रदेशातील देवरियामध्ये पाहायला मिळाले आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये दोन पोलीस ट्रायसिकलवर बसलेल्या एका दिव्यांग तरुणाला मारहाण करताना दिसत आहेत. रुद्रपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कर्तव्यावर तैनात असलेल्या पोलिस कर्मचार्‍यांनी पाणी मागितल्याने दिव्यांग व्यक्तीला मारहाण केल्याचा आरोप केला जात आहे. हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करत समाजवादी पक्षाने योगी सरकारच्या कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. तसेच पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.


नेमकं काय झालं?


रात्रीच्या सुमारास सचिन सिंह नावाचा दिव्यांग व्यक्ती रस्त्याने परतत होता. त्यावेळी त्याने पोलिसांना पाणी मागितले. मात्र यामुळे ते संतप्त झाले आणि त्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. "मी रात्री 11 च्या सुमारास ढाब्यावरून जेवण करून परतत होतो. बायपास वरून येताना वाटेत एक कासव दिसले, वाटले ते रस्त्यावरच राहिले तर मरेल, मी ते उचलले आणि एका व्यक्तीच्या मदतीने एका डबक्यात टाकले. त्यानंतर माझ्या हाताला खूप घाण वास येत होता. तेव्हा तिथे आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना मी हात धुण्यासाठी बाटलीतील पाणी मागितले. त्यावरुन ते संतापले आणि त्यांनी मला शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली," असे पीडित तरुणाने सांगितले.



मला गांजाच्या खोट्या प्रकरणात अडकवण्याची धमकी देऊन निर्दयीपणे मारहाण केल्याचे पीडित तरुणाने सांगितले. मारहाणीदरम्यान दिव्यांगांचा फोनही तुटला. एका व्यक्तीने त्याच्या घरातून या मारहाणीचा व्हिडिओ बनवला आणि तो सोशल मीडियावर व्हायरल केला. दरम्यान याप्रकरणी पोलीस विभागाने कारवाई केली आहे. पोलिस अधीक्षक संकल्प शर्मा यांनी सांगितले की, दोन्ही जवानांविरुद्ध संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल केल्यानंतर त्यांना कर्तव्यावरून काढून टाकण्यात आले आहे. "दोघेही पीआरडी कर्मचारी आहेत, त्यांना कर्तव्यावरून काढून टाकताना त्यांच्याविरुद्ध प्राप्त झालेल्या अर्जाच्या आधारे रुद्रपूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला जात आहेत," असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.