पेट्रोल-डिझेलच्या डिजीटल पेमेंटवरच्या डिस्काऊंटमध्ये कपात
डिजीटल पेमेंटला चालना देण्यासाठी केंद्रातल्या मोदी सरकारनं पेट्रोल-डिझेल खरेदीवेळी डेबिट-क्रेडिट कार्ड वापरल्यास कॅशबॅक देण्याचा निर्णय घेतला होता.
नवी दिल्ली : डिजीटल पेमेंटला चालना देण्यासाठी केंद्रातल्या मोदी सरकारनं पेट्रोल-डिझेल खरेदीवेळी डेबिट-क्रेडिट कार्ड वापरल्यास कॅशबॅक देण्याचा निर्णय घेतला होता. यानुसार ग्राहकांना ०.७५ टक्के कॅशबॅक मिळत होता पण आता ०.२५ टक्के एवढाच कॅशबॅक मिळणार आहे. १३ डिसेंबर २०१६ पासून पेट्रोल डिझेल खरेदी केल्यानंतर ग्राहकांना ०.७५ टक्के डिस्काऊंट मिळत होता. पेट्रोल-डिझेल भरल्यानंतर ३ दिवसांमध्ये ही सूट ग्राहकांच्या खात्यामध्ये जमा होत होती.
०.७५ टक्के सुट दिल्यामुळे ग्राहकांना पेट्रोल ५७ पैसे आणि डिझेल ५० पैसे स्वस्त मिळत होते. पण आता सूट कमी केल्यामुळे पेट्रोल १९ पैसे आणि डिझेल १७ पैसे स्वस्त मिळणार आहे.
८ नोव्हेंबर २०१६ साली पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ५०० आणि एक हजार रुपयाच्या जुन्या नोटा बंद करण्याची घोषणा केली. यानंतर एका महिन्यानी डिजीटल पेमेंटला चालना देण्यासाठी हा कॅशबॅकचा डिस्काऊंट देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
४.५ कोटी लोक दिवसाला १,८०० कोटी रुपयांचं पेट्रोल-डिझेल वापरतात, असं त्यावेळी सांगितलं गेलं. नोटबंदीनंतर एका महिन्यामध्ये डिजीटल पेमेंटचा वापर ४० टक्क्यांनी वाढला होता. पण अर्थव्यवस्थेमध्ये पैसे आल्यानंतर हा वापर कमी झाल्याचं पाहायला मिळालं.