तब्बल ४९२ वर्षांनंतर अयोध्येत होणार दिव्यांचा झगमगाट
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ १३ नोव्हेंबर रोजी मंदिर परिसरात उपस्थित राहणार आहेत.
नवी दिल्ली : यंदाच्या वर्षी देशात कोरोना व्हायरसंचं सावट असलं तरी अयोध्या नगरीत तब्बल ४९२ वर्षांनंतर दिव्यांचा झगमगाट पाहायला मिळणार आहे. उत्तर प्रदेशातील अयोध्या येथील भव्य श्री राम मंदिर बांधण्याचे काम सुरू झाले आहे. जवळपास तीन वर्षांनंतर हे मंदिर भक्तांसाठी खुलं करण्यात येणार आहे. दरम्यान, अयोध्येत दिवाळी खास पद्धतीने साजरी करण्याची तयारी सुरू आहे. यंदाच्या वर्षी अस्थायी मंदिरामध्ये दिव्यांचा झगमगाट करण्यात येणार आहे. त्यामुळे यावर्षी राम मंदिर परिसरात दिव्याचा उत्सव पाहायला मिळणार आहे.
महत्त्वाची गोष्ट म्हणजे संपूर्ण अयोध्येत ५ लाख ५१ हजार लाख दिवे लावण्यात येणार आहेत. तब्बल ४९२ वर्षांनंतर राम जन्मभूमी परिसरात पहिल्यांदा भव्य दिवाळी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यापूर्वी फक्त मर्यादित परिसरात दिवाळी साजरी केली जात असे. शिवाय फक्त मंदिरातील पुजाऱ्यांना दिवे लावण्याची परवानगी होती.
मात्र यावर्षी मंदिरामध्ये विशेष पूजा करण्यात येणार आहे. यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ १३ नोव्हेंबर रोजी मंदिर परिसरात उपस्थित राहणार आहेत. रामललाचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास म्हणाले, यंदाच्या वर्षी दिवाळी राम जन्मभूमी येथे साजरी करण्यात येणार आहे. ही दिवाळी अद्वितीय आणि अद्भुत असणार असल्याचं त्यांनी सांगितलं.