नवी दिल्ली: सोशल मीडियावर राहुल गांधी यांची प्रभावीपणे प्रतिमानिर्मिती करण्यात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या दिव्या स्पंदना उर्फ रम्या यांच्याकडून सोशल मीडिया सेलच्या प्रमुखपदाची सूत्रे काढून घेण्यात आल्याचे वृत्त आहे. रम्या यांच्या नेतृत्त्वाखाली काम करणाऱ्या निखिल अल्वा यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुजरात निवडणुकीपूर्वी रम्या यांच्याकडे सोशल मीडिया सेलची सूत्रे देण्यात आली होती. त्यावेळी रम्या यांनी सोशल मीडियावर प्रभावीपणे केलेल्या प्रचारामुळे भाजपची चांगली गोची झाली होती. 


तसेच रम्या यांनी राहुल गांधींची जनमानसात प्रतिमा उंचावण्यातही मोठी भूमिका बजावली होती. 


मात्र, गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसमधील एका गटाकडून रम्या यांच्याविरोधात पक्षश्रेष्ठींचे कान भरले जात होते. रम्या यांच्याविषयीच्या खोट्या गोष्टी प्रियांका गांधी यांना सांगितल्या जात होत्या. 


मात्र, जयराम रमेश यांच्याकडे पक्षाच्या समन्वय समितीची सूत्रे सोपवण्यात आल्यानंतर रम्या यांच्या अडचणी खऱ्या अर्थाने वाढल्या. 


जयराम रमेश यांनीच राहुल गांधींचे ट्विटर हँडल रम्या यांच्याऐवजी निखिल अल्वा यांच्याकडे सोपवण्याचा प्रस्ताव सुचवला. यानंतर रम्या यांना सोशल मीडिया सेलच्या प्रमुखपदावरून पद्धतशीरपणे बाजूला सारण्यात आले. 


मात्र, रम्या यांनी हे सर्व दावे फेटाळून लावले आहेत. २०१९ चे मिशन पूर्ण होईपर्यंत मी कुठेही जाणार नाही, असे त्यांनी सांगितले.