मुंबई : दिवाळीच्या प्रकाशमय आणि आनंददायी पर्वाला सर्वत्र सुरुवात झाली आहे. सोशल मीडिया म्हणू नका, किंवा मग काही खास ठिकाणं म्हणू नका सर्वत्र दिवाळीचाच उत्साह पाहायला मिळत आहे. विविधतेने नटलेल्या भारतामध्य़े हा सण साजरा करण्याच्या पद्धतींमध्येही विविधता आढळून येते. मुख्य म्हणजे या साऱ्या वातावरणात परदेशी नागरिकही एकरुप झाले आहेत. सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आलेला त्यासंबंधीचाच एक व्हिडिओ सध्या अनेकांचं लक्ष वेधत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतातील नवी दिल्ली येथे असणाऱ्या अमेरिकन दुतावासाच्या ट्विटर अकाऊंटवरुन हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये परदेशी नागरिकही दिवाळीच्या या उत्साहात एकरुप झाले आहेत. तेसुद्धा भारतीय अंदाजात. पारंपरिक भारतीय वेशभूषेत या नागरिकांनी बॉलिवूड चित्रपट गीतांवर ठेकाही ठरल्याचं या व्हिडिओत दिसत आहे. 


सोशल मीडियावर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आल्य़ानंतर लगेचच त्यावर अनेक नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया देण्यासही सुरुवात केली. काहींनी या परदेशी पाहुण्यांच्या वेशभूषेची, काहींनी त्यांच्या नृत्याची, तर काहींनी त्यांच्या उत्साहाची आणि उत्सुकतेची प्रशंसा केली आणि सर्वांनाच दिवाळीच्या शुभेच्छाही दिल्या. 



भारतीय संस्कृती आणि सणोत्सवांविषयी परदेशी नागरिकांच्या मनात कायमच कुतूहल पाहायला मिळतं. या कुतूहलापोटी भारतीय संस्कृती आणखी जवळून पाहण्यासाठी आणि त्याविषयीच्या अभ्यासपूर्ण निरिक्षणासाठी अनेकजण पुढे येण्याच्या प्रमाणातही गेल्या काही दिवसांपासून वाढ झाली आहे. त्याचीच एक झलक म्हणून हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड गाजत आहे.