दुर्गापूजेची नव्हे तर मोहरमच्या मिरवणुकीची वेळ बदला; योगी आदित्यनाथांनी अधिकाऱ्यांना बजावले
संपूर्ण देशात दुर्गापूजा आणि मोहरम एकाच दिवशी येतात.
पश्चिम बंगाल: लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात अत्यंत संवेदनशील झालेल्या पश्चिम बंगालमध्ये बुधवारी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची सभा झाली. यावेळी योगी आदित्यनाथ यांनी पुन्हा एकदा हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावरून मतदारांना साद घातली. त्यांनी म्हटले की, पश्चिम बंगाल सरकार अल्पसंख्यांकांची मते मिळवण्यासाठी राजकारण करत आहे. संपूर्ण देशात दुर्गापूजा आणि मोहरम एकाच दिवशी येतात. त्यासाठी उत्तर प्रदेशातील काही अधिकारी माझ्याकडे आले होते. त्यांनी मोहरमच्या निवडणुकीसाठी दुर्गापूजेची वेळ बदलता येईल का?, असा प्रश्न त्यांना विचारला. मात्र, मी त्यांना स्पष्टपणे बजावले की, दुर्गापूजेची वेळ अजिबात बदलणार नाही. तुम्हाला वेळ बदलायचीच असेल तर मोहरमच्या मिरवणुकीची वेळ बदला, असे आपण अधिकाऱ्यांना सांगितल्याचे योगी आदित्यनाथ यांनी म्हटले.
पश्चिम बंगालमध्ये योगी आदित्यनाथ यांच्या प्रचारसभांसाठी सरकारकडून परवानगी देण्यात आली नव्हती. यापूर्वी फुल बगान परिसरात आयोजित करण्यात आलेली त्यांची प्रचारसभा रद्द करावी लागली होती. या सभेच्या ठिकाणी व्यासपीठ उभारणाऱ्या डेकोरेटला मारहाण करण्यात आली. मात्र, भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी योगी आदित्यनाथ यांना एकाही सभेतून माघार घेऊ नका, असा आदेश दिला. त्यामुळे आज योगी आदित्यनाथ बारासात येथील प्रचासभेला उपस्थित होते.
दरम्यान, मंगळवारी संध्याकाळी अमित शहा यांच्या कोलकाता येथील रोड शो दरम्यान भाजप आणि तृणमूल काँग्रेसमध्ये झालेल्या राड्यानंतर येथील वातावरण प्रचंड तापले आहे. या रोडशोवर कुठे दगडफेक करण्यात आली तर कुठे रस्त्यावरच आग लावून रोड शोचा निषेध करण्यात आला. या पार्श्वभूमीवर भाजप आणि तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांकडून परस्परांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत.