Does writing anything on the bank note make it invalid: अनेकदा तुम्ही छापील चलनी नोटांवर पेनाने लिहिलेला मजकूर पाहिला असेल. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या अनेक फोटोंमध्ये तुम्ही नक्कीच 'सोनम गुप्ता बेवफा है' मजकूर असलेली 10 रुपयांची नोट पाहिली असेल. मात्र अशा नोटांसंदर्भात सर्वसमान्यपणे पडणार प्रश्न म्हणजे, अशाप्रकारे नोटांवर लिहिल्यास त्या नोटा स्वीकारल्या जातात की नाही? पेनाने मजकूर लिहिलेल्या नोटा वापरास निरुपयोगी ठरतात का? अशाप्रकारे मजकूर लिहिल्याने नोटेच्या वैधतेवर शंका घेता येते का? अशा नोटा नाकारता येऊ शकतात का? या आणि अशा अनेक प्रश्नांना नुकतेच सरकारने उत्तर दिले आहे.



कोणी दिली यासंदर्भातील माहिती?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केंद्र सरकारच्या पत्रसूचना विभागाने (पीआयबीने) चलनी नोटांवरील मजकुरासंदर्भातील शंकांबद्दलचा खुलासा केला आहे. व्हायरल होणाऱ्या खोट्या बातम्याबद्दल स्पष्टीकरण देण्यासाठी पीआयबीअंतर्गत ‘पीआयबी फॅक्ट चेक’ (PIB Fact Check) नावाचं ट्विटर अकाऊंट चालवलं जातं. या अकाऊंटवरुन व्हायरल होणाऱ्या बातम्यांची सत्यता पताळून त्यासंदर्भात थेट सरकारकडूनच स्पष्टीकरण दिलं जातं. याच ट्विटर हॅण्डलवरुन चलनी नोटांसंदर्भात खुलासा करण्यात आला आहे. या विषयासंदर्भात कायमच सोशल मीडियावर वेगवेगळ्या पद्धतीची माहिती वाचायला मिळते. मात्र आता केंद्र सरकारच्या अख्त्यारित येणाऱ्या खात्याकडून यासंदर्भात स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.


सोशल मीडियावरील व्हायरल मेसेजमधील दावा काय?


नव्या 100, 200, 500 आणि 2000 हजार रुपयांच्या नोटांवर मजकूर लिहिला असेल तर त्या अवैध ठरतात अशी माहिती अनेकदा सोशल मीडियावर वाचायला मिळते. सामान्यपणे 'रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया'च्या नावाखाली ही चुकीची माहिती परसवली जाते. "आरबीआयच्या नियमांनुसार नोटांवर काहीही लिहिल्यास त्या अवैध ठरतात. अशा नोटा व्यवहारात वापरता येत नाही," असा दावा आरबीआयच्या नावाने व्हायरल केल्या जाणाऱ्या पोस्टमध्ये केला जातो. मात्र हे सत्य नसून यासंदर्भातील स्पष्टीकरण पीआयबीने दिलं आहे. 



सरकारचं म्हणणं काय?


चलनी नोटांवर काहीही लिहिल्यास त्या अवैध ठरतात का? असा प्रश्न पोस्ट करत पीआयबीने त्यावरील उत्तर दिलं आहे. या प्रश्नाला नाही असं उत्तर पीआयबीने दिलं आहे. "मजकूर लिहिलेल्या बँकेच्या नोटा अवैध ठरत नाहीत. त्या कायदेशीरदृष्ट्या देवाणघेवाणीसाठी वापरल्या जाऊ शकतात," असं पीआयबीने पहिल्या ओळीत स्पष्ट केलं आहे. तर दुसऱ्या ओळीमध्ये, "स्वच्छ चलनी नोट धोरणानुसार लोकांनी नोटांवर काहीही लिहू नये. असं केल्यास नोटा खराब होतात आणि त्यांचं आयुष्यमान कमी होतं," असं म्हटलं आहे.



आरबीआयचं धोरण काय?


आरबीआयच्या धोरणानुसार चांगल्या प्रतीच्या चलनी नोटा व्यवहारामध्ये राहतील आणि जुन्या तसेच खराब झालेल्या नोटा वेळोवेळी बदलल्या जातील याची काळजी घेतली जाते. 1999 सालापासून लागू केलेल्या धोरणानुसार नोटा आणि नाण्यांच्या दर्जाचं व्यवस्थापन केलं जातं. या धोरणांमध्ये लोकांनी नोटांवर काहीही लिहू नये अशी विनंती आरबीआयने केली आहे. मात्र यात मजकूर लिहिलेल्या नोटा कायदेशीररित्या अवैध ठरतील असं कुठेही नमूद करण्यात आलेलं नाही.