लंडन : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे सध्या युरोप दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावेळी त्यांनी लंडनमध्ये इंडियन जर्नलिस्ट असोसिएशनशी बातचित केली. या कार्यक्रमात राहुल गांधींना पंतप्रधान बनण्याच्या इच्छेबाबत प्रश्न विचारण्यात आला. पण मी वैचारिक लढाई लढतोय, पंतप्रधान बनण्याची माझी महत्वाकांक्षा नाही, असं उत्तर राहुल गांधींनी दिलं. २०१४ नंतर माझ्यामध्ये हा बदल झाला आहे. ज्या पद्धतीनं गोष्टी घडतायत, त्यामुळे देश धोक्यात आहे. याविरुद्ध मी लढत आहे, अशी प्रतिक्रिया राहुल गांधींनी दिली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राहुल गांधींचं हे वक्तव्य कर्नाटक निवडणुकीवेळी केलेल्या वक्तव्याच्या उलट आहे. २०१९ साली काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्या तर मी पंतप्रधान होईन, असं राहुल गांधी तेव्हा म्हणाले होते.


मी सकाळी उठतो तेव्हा देशातल्या संस्थांना कसं वाचवू शकतो आणि माझा देश एकत्र राहून कसं काम करू शकतो याचाच विचार करतो, असं राहुल गांधी म्हणाले.


नोकरी नसल्यामुळे राग असलेल्या नागरिकांनी मोदी आणि ट्रम्प यांचं समर्थन केलं, असं मत राहुल गांधींनी व्यक्त केलं. भारतामध्ये बेरोजगारीचं संकट आहे. चीनमध्ये दिवसाला ५० हजार तर भारतात दिवसाला फक्त ४५० नव्या नोकऱ्या तयार होतात, असं वक्तव्य राहुल गांधींनी केलं.