नवी दिल्ली: भारताच्या दौऱ्यावर आलेले अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात (CAA) देशभरात सुरु असलेल्या हिंसाचाराबद्दल बोलण्यास नकार दिला. त्यांनी मंगळवारी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ट्रम्प यांनी म्हटले की, मला CAA विषयी काहीही बोलायचे नाही. हा भारताचा अंतर्गत प्रश्न आहे. मला आशा आहे की, भारत स्वत:च्या नागरिकांसाठी योग्य निर्णय घेईल, असे ट्रम्प यांनी म्हटले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'भारतातील हिंसाचार आंतरराष्ट्रीय पातळीवर दडपण्यासाठी ट्रम्प यांची खुशामत'


यावेळी ट्रम्प यांना CAA कायद्याविरोधात ईशान्य दिल्लीत सुरु असलेल्या हिंसाचाराविषयीही विचारण्यात आले. तेव्हाही मी पंतप्रधान मोदींशी याबाबत चर्चा केली नसल्याचे त्यांनी म्हटले. एखादी परिस्थिती कशी हाताळायची, हा भारताचा अंतर्गत प्रश्न असल्याचीही पुस्तीही त्यांनी जोडली. मात्र, आमच्यात आमच्यात धार्मिक स्वातंत्र्याबद्दल चर्चा झाली. भारतातील लोकांना धार्मिक स्वातंत्र्य मिळावे, अशी मोदींची इच्छा असल्याचे त्यांनी म्हटले. यासाठी पंतप्रधान मोदी मेहनत घेत असल्याचेही ट्रम्प यांनी सांगितले. 


Delhi Violence: दिल्लीतील हिंसाचारात १० जणांचा मृत्यू; १३० जखमी


दरम्यान, ईशान्य दिल्लीत गेल्या दोन दिवसांपासून हिंसाचार सुरु आहे. आतापर्यंत यामध्ये १० जणांचा मृत्यू झाला असून जवळपास १३० जण जखमी झाले आहेत. या पार्श्वभूमीवर ईशान्य दिल्लीत एका महिन्यासाठी (२४ फेब्रुवारी ते २४ मार्च) जमावबंदी लागू करण्यात आली आहे. ईशान्य दिल्लीतील मौजपूर, बाबरपूर, जाफराबाद, गोकुलपुरी, बृजपुरी या परिसरात पोलीस आणि शीघ्र कृती दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.