सूरत : दुष्काळाच्या नावानं बोंब मारणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ड्रॅगनफ्रूटची शेती वरदान ठरु लागलीय. गुजरातच्या सुरतमधील एका शेतकऱ्यानं हे सिद्ध करुन दाखवलंय. ड्रॅगनफ्रूट... अर्थात ड्रॅगनफळ... निवडुंग वर्गातील एक वेल आहे. मध्य अमेरिकेतलं हे फळ आता जगभरातील बाजारपेठांमध्ये पोहोचलंय. याला कारण आहे ते फळातून मिळणारी जीवनसत्व आणि प्रथिनं... या पिकाची लागवड करताना झाडांना द्राक्षाच्या वेलीप्रमाणे आधार द्यावा लागतो. कमी पाण्यातही हे पीक उत्तमरित्या येतं. या फळाची चव किवी फळासारखी असते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सूरतमधील प्रविण देसाई शेतकऱ्यानं आपल्या शेतात सेंद्रीय पद्धतीनं या पिकाची लागवड केलीय. प्रायोगिक तत्वावर त्यांनी २०० रोपांची लागवड केली मात्र या पिकाला लागणारा कमी खर्च आणि अधिक उत्पादन लक्षात घेता त्यांनी तब्बल ५ हजार झाडांची लागवड केलीय. विशेष म्हणजे, त्यांनी आपल्या शेतातील मोकळ्या जागेत ही झाडं लावलीत त्यामुळे जागेचा प्रत्येक कोपरा वापरात आलाय. 


ड्रॅगनच्या झाडास पाणी कमी लागतं, देखभाल खर्च कमी येतो, भारतीय हवामान या पिकाला पोषक आहे,  त्यामुळे २ ते ३ वर्षांतच गुंतवणुकीचा सर्व खर्च निघतो. या फळांना स्थानिक तसंच आंतरराष्ट्रीय बाजारातही मोठी मागणी आहे.



कटींग पद्धतीनं या पिकाची लागवड केली जाते. फळाच्या वाढीसाठी शेणखत किंवा सेंद्रिय खते महत्त्वाची भूमिका पार पाडतात. प्रत्येकी वनस्पतीला किंवा वेलीला १० ते १५ किलो शेणखत आणि २५० ते ५०० ग्रॅम कल्पतरू सेंद्रिय खत द्यावे. त्यानंतर दरवर्षी बहार धरताना मे - जूनमध्ये याप्रमाणेच सेंद्रिय खते द्यावीत.


आपल्याकडे ड्रॅगन फळामध्ये अद्याप कुठल्याही प्रकारचे किड व रोग आढळलेले नाहीत मात्र बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी वेळीच फवारणी घेणं फायद्याचं ठरतं. नियोजनबद्ध पद्धीतीनं लागवड केल्यास या पिकापासून शेतकरी मालामाल होईल, हे मात्र नक्की.