बिजनौर: पश्चिम उत्तर प्रदेशातील नजीबाबाद आणि परिसरात शुक्रवारी (६ जुलै) एकच खळबळ उडाली. मुरशदपूर रेल्वे स्थानकातील स्टेशन मास्तर दारूच्या नशेत तर्राट होऊन झोपी गेला. कर्तव्यावर असतानाच त्याने हा पराक्रम केल्यामुळे त्याचा मोठा फटका मर्गावरू धावणाऱ्या रेल्वेला बसला. या रेल्वे मार्गावरून जाणाऱ्या सर्व गाड्यांना जागीच ब्रेक लागला. कारण, नेहमीप्रमाणे रेल्वेस्थानकावरून गाडी पुढे जाण्यासाठी मिळणारा सिग्नलच मिळत नव्हता. नियमानुसार सिग्नल नसेल तर गाडी पुढे नेता येत नाही. या प्रकारामुळे जम्मूतवी-हावडा गाडी जागेवरच थांबली. त्याचा परिणाम म्हणून चार एक्सप्रेस आणि दोन मालगाड्यांनाही मार्ग उपलब्ध होऊ शकला नाही. इतक्या मोठ्या प्रमाणावर गाड्या थांबल्याचे रेल्वे प्रसासनाच्या लक्षात येताच अधिकाऱ्यांचे एक पथक शोधकार्यासाठी रवाना झाले. पथकाने पाहिले तर स्टेशन मास्तर दारूच्या नशेत झोपल्याचा प्रकार पुढे आला. या प्रकारानंतर प्रशासनाने रेल्वे मास्तरला जागेवर निलंबीत केले.


फोन स्वीकारला नाही आणि गुंता वाढला


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नजीबाबाद पासून जवळपास दहा किलोमीटर अंतरावर मुरशदपूर रेल्वे स्टेशन आहे. या स्टेशनरवर शुक्रवारी रात्री स्टेशन मास्तर दीप सिंह कर्तव्यावर होते. सांगितले जात आहे की, दीप सिंह हे दारूच्या नशेत रात्री उशीरा कार्यालयात आले आणि लगोलग झोपीही गेले. दरम्यान, रात्री साडे दहाच्या सुमारास नजीबाबाद स्टेशनचे मास्तर अविनाश गुप्ता यांनी मुरशदपूर रेल्वे स्टेशनशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. हा संपर्क डेहराडूनवरून वाराणसीकडे जाणाऱ्या जनता एक्सप्रेस ट्रेनला मार्ग उपलब्ध होण्याबाबत होता. पण, अनेकदा संपर्क करूनही स्टेशन मास्तरांकडून फोन स्वीकारण्यात आला नाही.


दारूच्या नशेत बाकड्यावर दिली ताणून


दीप सिंह यांच्यासी संपर्क होऊ न शकल्याने ट्रेन नजीबाबाद स्टेशनवरच थांबविण्यात आली. तसेच, नजीबाबादच्या स्टेशन मास्तरांनी मुरादाबाबद कंट्रोल रूमला फोन करून या प्रकाराची माहिती दिली. काहीतरी अघटीत झाल्याचा संशय आल्याने एकच खळबळ उडाली. अधिकाऱ्यांच्या सूचनेनंतर दुसऱ्या स्थानकातील स्टेशन मास्तर व्ही पी शुक्ला मरशदपूरला पोहोचले तर, हे महोदय कार्यालयातील एका बाकड्यावर गाढ झोपले होते. बाकड्याखाली दारूच्या बाटल्या होत्या. व्ही पी शुक्ला यांनी या प्रकाराची माहिती स्टेशन अधीक्षक आर के मीणा यांना दिली. त्यांनी प्रकरण गांभीर्याने घेत रेल्वे पोलीसांना सूचना दिल्या आणि घटनास्थळावर पाठवले. पोलीस नशेत तंगाट झालेल्या या स्टेशन मास्तरला घेऊन मुख्य कार्यालयात आले. 


कर्तव्यात कसूर व बेजबाबदारपणा केल्याच्या कारणावरून स्टेशन मास्तरांना निलंबीत करण्यात आले आहे.