मुंबई : त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब देव यांनी आपल्या एका वक्तव्यानं अनेकांना चकीत करून टाकलंय. बदकांमुळे पाण्यातला ऑक्सीजन वाढतो, असं वक्तव्य करून बिप्लब देव पुन्हा एका चर्चेत आलेत.  जेव्हा बदक पाण्यामध्ये पोहतात तेव्हा पाण्याची ऑक्सीजन पातळी आपोआप वाढायला सुरुवात होते, असं बिप्लब देव यांनी म्हटलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपल्या राज्यातील ग्रामीण भागांत ५०,००० बदकं वितरीत करण्याचा मुख्यमंत्र्यांचा मानस आहे. यामुळे ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला चालना मिळू शकेल, असं देव यांचं म्हणणं आहे. बदकांचे फायदे सांगत असताना मुख्यमंत्र्यांनी 'बदकांमुळे ऑक्सिजनचं रिसायकलिंग होतं...आणि त्यांचं पाण्यात पोहणं पाण्याची ऑक्सिजनमध्ये भर टाकतं आणि पाण्यातला ऑक्सिजन वाढतो' असं त्यांनी म्हटलंय.\


अधिक वाचा :- खरंच बदकांमुळे पाण्यातला ऑक्सीजन वाढतो? काय सांगतात संशोधक


'जेव्हा बदक पाण्यामध्ये पोहतात तेव्हा पाण्यातली ऑक्सिजनची पातळी आपोआप वाढण्यास सुरूवात होते. त्यामुळे ऑक्सिजनचं रिसायकलिंग होतं. पाण्यात माशांना जास्तीत जास्त ऑक्सीजन मिळतो. त्यामुळे मत्स्यपालनात शेतकऱ्यांना अधिक फायदा होऊ शकेल आणि माशांची पैदासही वेगात होऊ शकेल... आणि तीही ऑर्गेनिक पद्धतीनं...' असं वक्तव्य बिप्लब देव यांनी केलंय. 


बिप्लब देब यांचं हे वक्तव्य सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलंय. अनेकांनी बिप्लब देव यांची खिल्ली उडवलीय... तर त्रिपुराचे भाजपचे प्रवक्ते डॉ. अशोक सिन्हा यांनी देब यांच्या वक्तव्याचं समर्थन करत थेट 'एफएओ' अहवालाचा हवाला दिला. 'पोहताना बदक वायुचा प्रसार करतात', असं त्यांनी म्हटलंय.  









तर त्रिपुराच्या विज्ञान मंचाचे महिर लाल रॉय यांनी मुख्यमंत्र्यांनी हे वक्तव्य कोणत्याही वैज्ञानिक आधाराशिवाय केल्याचं म्हटलंय. 'विज्ञान मंच' २०१० पासून ही संघटना वैज्ञानिक विचारांच्या प्रसाराचं काम करते.  


याआधाही महाभारत काळात इंटरनेट आणि सॅटेलाइट अस्तित्वात होतं, असं वक्तव्य बिप्लब देव यांनी केलं होतं... त्यानंतर पुन्हा एकदा मिस युनिव्हर्स डायना हेडन हिचं जिंकणं फिक्सिंग होतं, असा दावा त्यांनी केला आणि वाद ओढावून घेतला... हा वाद थांबतो न थांबतो तोच तरुणांनी नोकरीच्या मागे धावण्यापेक्षा पान टपऱ्या उघडाव्यात, गायी पाळाव्यात... असा सल्ला देऊनही ते चर्चेत आले.