`या` शहरांमध्ये पुन्हा लॉकडाऊन; विनाकारण बाहेर पडल्यास...
देशभरातील कोरोना रुग्णांची संख्या ही ११,१८,०४३ इतकी झाली आहे.
लखनऊ : देशात कोरोना व्हायरसचा कहर वाढताना दिसत आहे. दिवसागणिक कोरोना रुग्णांच्या संख्येत होणारी वाढ चिंताजनक असल्याचं स्पष्ट होत आहे. प्रत्येक दिवसाला देशात ३५ हजारांपेक्षा जास्त नागरिक कोरोना व्हायरसच्या विळख्यात सापडत असून कोरोनाविरोधात युद्ध लढणाऱ्या डॉक्टरांनी ही संख्या दुप्पट होण्याची शक्यता व्यक्त केली. त्यामुळे देशात अनेक राज्यांच्या काही भागांमध्ये पुन्हा लॉकडाऊनची घोषणा केली.
सोमवार म्हणजे २० जुलैपासून उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये पुन्हा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. लखनऊच्या इंदिरा नगर, गाजीपूर, आशियाना, सरोजनी नगर या चार भागांमध्ये आज रात्री १० वाजल्यापासून पुन्हा लॉकडाऊन करण्यात येणार आहे. अत्यावश्यक सेवा मात्र सुरू राहणार आहेत.
राजधानीमधील ज्या भागांमध्ये रुग्णांची संख्या अधिक आहे. अशा भागांना कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करत पुन्हा लॉकडाऊन करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. शिवाय जो लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करणार नाही, त्याच्या विरोधात तक्रार देखील दाखल करण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे.
दरम्यान, देशभरातील कोरोना रुग्णांची संख्या ही ११,१८,०४३ इतकी झाली आहे. ज्यामध्ये ३,९०,४५९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर, ७,००,०८७ रुग्णांनी या विषाणूवर मात केली आहे. आतापर्यंत देशभरात कोरोनामुळं जीव गमवावा लागलेल्यांची संख्या २४,४९७ वर पोहोचली आहे.