लखनऊ : उत्तरप्रदेशमध्ये गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस आहे. मुसळधार पावसामुळे शुक्रवारी जवळपास २० जणांचा मृत्यू झाला आहे. घर आणि झाड पडल्यामुळे मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एका आप्तकालीन बैठकीत सर्व जिल्हाधिकाऱ्यांना २४ तासांच्या आत पावसामुळे संबंधित घटनांमध्ये मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना ४ लाख रुपयांची भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याचे आणि आवश्यक त्या सुविधा पुरवण्यासाठी नुकसानग्रस्त भागाचा दौरा करण्याचेही आदेश दिले आहेत.


अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रयागराजमध्ये शुक्रवारी घर पडल्यामुळे ५ लोकांचा मृत्यू झाला. तर १० लोक जखमी झाले. अशाच प्रकारच्या एका घटनेत प्रतापगढमध्ये ४ आणि भदोहीमध्ये २ जणांचा मृत्यू झाला. 



महोबामध्ये झाड पडल्यामुळे ३ लोकांचा आणि वाराणसीमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला. राय बरेलीमध्ये २, बाराबंकीमध्ये ३ आणि अयोध्या, आंबेडकरनगरमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.



मुसळधार पावसामुळे शुक्रवारी लखनऊ, अयोध्या आणि अमेठीमध्ये सर्व शाळांना सुट्टी देण्यात आली. पावसामुळे रस्त्यांवर पाणी भरल्याने वाहतुकीवरही त्याचा परिणाम पाहायला मिळाला. लखनऊमधील अनेक भागात दूरसंचार आणि वीजपुरवठाही खंडित करण्यात आला होता. 


रविवारीही अशाच प्रकारच्या मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.