दसऱ्याच्या आठवड्यात चला गोव्याला, तेसुद्धा परवडणाऱ्या दरात; IRCTC नं आणलाय धमाकेदार प्लॅन
Dusshera Long Weekend IRCTC Goa Tour Package: भारतीय रेल्वेनं तुमच्यासाठी आणलाय खास गोव्याच्या सफरीचा प्लान. किंमत तुम्हालाही परवडेल. चला तयारीला लागा....
Dusshera Long Weekend IRCTC Goa Tour Package: नवरात्रोत्सवाची धूम सगळीकडेच सुरु असताना आता अनेकांच्याच नजरा आहेत त्या म्हणजे लागोपाठ येणाऱ्या सुट्ट्यांवर. कारण, धकाधकीच्या या रोजच्या जीवनात काही उसंत क्षण मिळाले, तर ते क्षण मार्गी लावण्यासाठी म्हणून निवांत ठिकाणी भेट देण्याची अनेकांचीच इच्छा असते. यात बऱ्याचजणांचं प्राधान्य असणारं ठिकाण असतं गोवा.
तुम्हीही गेल्या काही काळापासून गोव्याला जाण्याचा बेत आखताय पण, जाणं शक्य होत नाहीये? हरकत नाही. कारण, आता हा प्लॅन पूर्ण होणार, तेसुद्धा आयआरसीटीसीच्या कृपेनं. ऑक्टोबर महिन्यात गोव्यात येणं आनंद द्विगुणित करणारं, कारण इथं पावसाळी दिवसांनंतर या महिन्यापासूनच वॉटर स्पोर्ट्सही पुन्हा सुरु झालेले असतात.
गोव्याला जाण्यासाठी तुम्ही तीन मार्गांचा वापर करु शकता. एक म्हणजे रेल्वेनं तात्काळ तिकीट काढून मडगाव आणि मग तिथून हवं त्या ठिकाणी जाणं. दुसरं म्हणजे विमान प्रवास करत कमीत कमी वेळात गोवा गाठणं आणि तिसरं म्हणजे रोड ट्रीप करत साधारण 15 तासांचा प्रवास करत गोव्यात पोहोचणं.
IRCTC देतेय गोव्यात फिरण्याची सुवर्णसंधी...
IRCTC कडून गोवा सफरीसाठी 5 दिवस आणि 4 रात्रींचं पॅकेज तयार करण्यात आलं आहे. या पॅकेजमधून तुम्हाला लखनऊ ते गोवा अशी फ्लाईट मिळेल. या पॅकेजमधून प्रवास करायचा झाल्यास तुम्हाला फ्लाईट, हॉटेल आणि तिथं फिरण्यासाठीच्या वाहनाचा खर्च समाविष्ट आहे.
या सहलीसाठी माणसी 51 हजार रुपये, दोन व्यक्तींसाठी माणसी 41 हजार रुपये आणि तीन व्यक्ती एकत्र गेल्यास माणसी 38150 रुपये इतका खर्च येतो. मुलांसमवेत सरकारी कर्मचाऱ्यांना इथं LTC चा फायदा मिळणार आहे. IRCTC च्या अधिकृत संकेतस्थळावरून यासंदर्भातील सविस्तर माहितीही देण्यात आली आहे.
हेसुद्धा पाहा : Same Sex Marriage ला नाकारणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या दाराशीच गे जोडप्याची Engagement
नागपूरहून हेच पॅकेज 4 दिवस आणि 3 रात्रींचं आहे. जिथं तुम्हाला नागपूरहून ट्रेन मिळेल. या पॅकेजमध्ये ट्रेन, हॉटेल आणि गोव्यात फिरण्यासाठीच्या वाहनखर्चाचा समावेश आहे. नागपूरहून गोव्यात भटकंतीसाठी माणसी 32500 रुपये, दोन व्यक्तींसाठी माणसी 24800 रुपये आणि तीन व्यक्ती असल्यास माणसी 24000 रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. गोव्याला पोहोचण्यासाठी कोकण रेल्वे मार्गावरून पुढं जाणारी आणि मडगाव येथे थांबणारी कोणतीही रेल्वे तुम्हाला या सहलीसाठी अपेक्षित ठिकाणी सोडू शकते. त्यामुळं फक्त थोडा research करा आणि बॅग भरून तडक गोवा फिरायला निघा.