सोसाट्याचा वारा आणि अवकाळी पावसामुळे १९ जणांचा मृत्यू
राजस्थानमध्ये बुधवारी सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पाऊस मोठ्या प्रमाणात झाला. अनेक बागांना रात्री अवकाळी पावसाचा तडाखा बसला. रात्रीच्या सुमारास वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह सुरू झालेला पावसामुळे नागरिकांची दैना उडाली.
जयपूर : राजस्थानमध्ये बुधवारी सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पाऊस मोठ्या प्रमाणात झाला. अनेक बागांना रात्री अवकाळी पावसाचा तडाखा बसला. रात्रीच्या सुमारास वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह सुरू झालेला पावसामुळे नागरिकांची दैना उडाली.
राजस्थानमधील अंधड येथील धौलपूर आणि भरतपूर जिल्ह्यात झालेल्या विविध अपघातांमध्ये दोन सख्या बहिणींसह १९ जणांचा मृत्यू झाला. यासोबतच ५० जण जखमी झाल्याचं वृत्त समोर आलं आहे.
वादळी वाऱ्यामुळे अनेक घरांचंही नुकसान झालं. तर, वीज कोसळल्याने काही नागरिक जखमी झाले. जखमी नागरिकांना उपचाराकरीता रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
भिंत कोसळल्याने अनेकांचा मृत्यू
अवकाळी पाऊस आणि वादळी वारा यामुळे विविध जिल्ह्यांत १४ नागरिकांचा मृत्यू झाला. यापैकी बहुतांश नागरिकांचा मृत्यू हा भिंत कोसळल्यामुळे झाला आहे. पिंकी (वय १८), सूरजभान (वय ६०) अंगावर झाड पडल्याने यांचा मृत्यू झाला. तर, भगवती देवी (वय ३०), खिलोनी (वय ३५), उमेश (वय १४), निर्मला ठाकूर (वय ३५), गुड्डी परमार (वय ४०), सुमन (वय ३०), मनीषा (वय २) मनोज (वय १८), रामअवतार (वय ४२) आणि पूनम (वय ७ वर्ष) यांचा मृतकांमध्ये समावेश आहे.
भरतपूरमध्ये पाच जणांचा मृत्यू
भरतपूर जिल्ह्यात झालेल्या विविध अपघातांमध्ये पाच नागरिकांचा मृत्यू झाला आहे. जिल्हाधिकारी नरेंद्र कुमार गुप्ता यांनी सांगितले की, विश्वंभर (६५), कमला (६०), अरुण (२५), चेतराम (५५) आणि योगेश (२०) यांचा विविध अपघातांमध्ये मृत्यू झाला आहे.