नवी दिल्ली - संपूर्ण उत्तर भारत बुधवारी सकाळी भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला. उत्तर भारतातील बहुतांश राज्यांमध्ये नागरिकांना भूकंपाचे धक्के जाणवले. मिळालेल्या माहितीनुसार रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ४ इतकी होती. दिल्ली एनसीआरमधील बागपथमध्ये भूकंपाचा केंद्रबिंदू होता. सकाळी आठच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. अनेकांनी ट्विटर आणि फेसबुकवरही भूकंपाचे धक्के जाणवल्याचे ट्विट आणि पोस्ट केल्या आहेत. दरम्यान, भूकंपामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सकाळी ऑफिसला जाण्याची गडबड प्रत्येक घरात असतानाच अचानक भूकंपाचे धक्के जाणवू लागल्यामुळे अनेक लोक धावत धावत घराबाहेर आले. दिल्ली आणि एनसीआरच्या अनेक भागांमध्ये सकाळपासून पाऊस पडतो आहे. आज दिल्लीमध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. त्यातच भूकंपाचे धक्के जाणवल्यामुळे नागरिकांची धावपळ उडाली. 
रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता जितकी जास्त असते. तितके धक्के जाणवण्याचे प्रमाण वाढते. ४ रिश्टर स्केलचा भूकंप सौम्य समजला जातो. तरीही या भूकंपामुळे बसणारे धक्के जाणवतात.