ज्या कंपनीने भारताला गुलाम बनवले, आज त्या ईस्ट इंडिया कंपनीचा मालक आहे भारतीय
ईस्ट इंडिया कंपनीचे नाव सगळ्यांना माहित असेल. 1857 पर्यंत भारत या कंपनीच्या ताब्यात होता.
मुंबई : सोमवारी संपूर्ण देश स्वातंत्र्य दिनाचा 75 वा वर्धापन दिन साजरा करत आहे. त्याची आठवण म्हणून गेल्या वर्षीपासून देशात अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाल्यापासून आजपर्यंतचा भारताचा प्रवास अतिशय रंजक राहिला आहे.
75 वर्षांत भारत एक मोठी आर्थिक शक्ती म्हणून उदयास आला आहे. ज्या 'ईस्ट इंडिया कंपनी'ने भारताला गुलाम बनवले होते, आज त्या कंपनीचा मालक एक भारतीय आहे हे ऐकूण तुम्हाला ही धक्का बसू शकतो. यावरून भारताच्या वाढत्या आर्थिक स्थितीचा अंदाज तुम्ही लावू शकता.
ईस्ट इंडिया कंपनीचे नाव शाळेपासून सगळ्यांना माहित असेल. 8वी-10वी पर्यंत इतिहासात देखील त्याची माहिती आहे. 17 व्या शतकाच्या सुरुवातीला म्हणजे 1600 च्या सुमारास भारताच्या भूमीवर पहिले पाऊल टाकणाऱ्या या कंपनीने शेकडो वर्षे आपल्या देशावर राज्य केले. 1857 पर्यंत भारत या कंपनीच्या ताब्यात होता.
ईस्ट इंडिया कंपनी ही भारतातील पहिली कंपनी होती, पण ती ब्रिटीश कंपनी होती. या कंपनीने भारताला गुलामगिरीत आणले. एकेकाळी ही कंपनी शेतीपासून खाणकाम आणि रेल्वेपर्यंतची सर्व कामे करत असे. आता गंमत अशी आहे की, भारताला गुलाम बनवणाऱ्या या ईस्ट इंडिया कंपनीचे मालक भारतीय वंशाचे उद्योगपती संजीव मेहता आहेत.
ईस्ट इंडिया कंपनी विकत घेतल्यानंतर मेहता यांनी ते ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म बनवले. सध्या ही कंपनी चहा, कॉफी, चॉकलेट आदींची ऑनलाइन विक्री करते. ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना 1600 मध्ये 31 डिसेंबर रोजी झाली. ही कंपनी स्थापन करण्यामागचा एकमेव उद्देश ब्रिटिश साम्राज्यवाद आणि वसाहतवादाला चालना देणे हा होता. ब्रिटनच्या त्या कालखंडाबाबत एक अतिशय लोकप्रिय म्हण आहे की ब्रिटिश राजवटीत सूर्य कधीच
मावळत नाही. सूर्याच्या परिघापेक्षा ब्रिटीश साम्राज्य मोठे करण्यात या ईस्ट इंडिया कंपनीचे सर्वात महत्त्वाचे योगदान होते. कंपनी मूळतः व्यवसाय करण्यासाठी स्थापन करण्यात आली होती, परंतु तिला युद्ध करण्याचा अधिकार यासारखे अनेक विशेषाधिकार मिळाले. कंपनीला हा अधिकार ब्रिटिश राजवटीने आपल्या व्यावसायिक हितसंबंधांचे रक्षण करण्यासाठी दिला होता. या कारणास्तव ईस्ट इंडिया कंपनीचे स्वतःचे शक्तिशाली सैन्य होते.
स्पेन आणि पोर्तुगाल सह प्रतिस्पर्धी
1600 च्या दरम्यान, स्पेन आणि पोर्तुगाल साम्राज्यवाद आणि व्यापारासाठी स्पर्धा करत होते. ब्रिटन आणि फ्रान्स हे उशिराने उतरले होते पण वेगाने त्यांचे वर्चस्व वाढवत होते. पोर्तुगीज खलाशी वास्को द गामा भारतात आल्यानंतर युरोपात मोठा बदल झाला. वास्को द गामा जहाजात भारतीय मसाले घेऊन जात असे.
भारतीय मसाले युरोपसाठी अद्वितीय होते. या मसाल्यापासून वास्को द गामाने अमाप संपत्ती मिळवली. यानंतर भारतीय मसाल्यांचा सुगंध युरोपभर पसरला. भारताच्या उत्कर्षाच्या चर्चांनी युरोपीय साम्राज्यवादी देशांनाही येथे वर्चस्व गाजवण्याची प्रेरणा दिली. ईस्ट इंडिया कंपनीने हे काम ब्रिटनच्या वतीने केले.
जहाज लुटून पहिला व्यापार
भारतातून मसाले घेऊन जाणारे पोर्तुगालचे जहाज लुटून या कंपनीला पहिले यश मिळाले. त्या लुटीत ईस्ट इंडिया कंपनीला 900 टन मसाले मिळाले. ते विकून कंपनीला प्रचंड नफा झाला. ही त्या काळातील पहिल्या चार्टर्ड संयुक्त स्टॉक कंपन्यांपैकी एक होती, म्हणजेच कोणताही गुंतवणूकदार सध्याच्या शेअर बाजारात सूचीबद्ध कंपन्यांप्रमाणे शेअरहोल्डर बनू शकतो.
लुटलेल्या कमाईचा हिस्सा कंपनीच्या गुंतवणूकदारांनाही मिळाला. इतिहासाच्या पुस्तकात असे सांगितले आहे की ईस्ट इंडिया कंपनीला लुटमारीच्या पहिल्या व्यापारात सुमारे 300 टक्के इतका प्रचंड नफा झाला होता.
भारतात, सर थॉमस रो यांनी मुघल सम्राटाकडून ईस्ट इंडिया कंपनीसाठी व्यापार करण्याचे अधिकार मिळवले. कंपनीने कलकत्ता (आता कोलकाता) येथून भारतात व्यवसाय सुरू केला आणि नंतर चेन्नई-मुंबई हे देखील तिचे मुख्य व्यवसाय केंद्र बनले.
भारतात ईस्ट इंडिया कंपनीला प्रथम फ्रेंच कंपनी 'डेस इंडेस'शी स्पर्धा करावी लागली. 1764 मध्ये बक्सरची लढाई कंपनीसाठी निर्णायक ठरली. यानंतर कंपनीने हळूहळू संपूर्ण भारतावर अधिकार प्रस्थापित केला.
1857 च्या उठावानंतर ब्रिटीश साम्राज्याने कंपनीच्या हातून भारताची सत्ता हिसकावून स्वतःच्या हातात घेतली. आता ते जगातील सर्वात श्रीमंत कंपन्यांच्या गणनेत कोठेही नाही. भारतीय वंशाच्या संजीव मेहता यांनी 2010 मध्ये 15 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच 120 कोटी रुपयांना कंपनी विकत घेतली होती.