सोनं खरं आहे की खोटं, कसं ओळखाल? सोप्या टिप्स...
मुंबई : अक्षय तृतीयाच्या निमित्तानं तुम्हीही सोनं खरेदीचा विचार करत असाल... सध्या 10 ग्रॅम सोन्याची किंमत घरगुती बाजारात 32,170 रुपयांच्या जवळपास आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, सोनं खरेदी करण्याची ही योग्य वेळ आहे. पण सोनं खरेदी करण्यापूर्वी आपण खरेदी करत असलेलं सोनं खरं आहे की खोटं, याची पडताळणी करणं गरजेचं आहे... अन्यथा तुमचीही फसवणूक होऊ शकते.
हॉलमार्क पाहून घ्या
यासाठी, सर्वात योग्य पर्याय म्हणजे हॉलमार्क पाहून मगच सोनं खरेदी करा. हॉलमार्क सरकारी गॅरंटी आहे. हॉलमार्कचं निर्धारण भारताची एकमात्र एजन्सी ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड (बीआयएस) करते.
असा ओळखा खरा हॉलमार्क
हॉलमार्किंगमध्ये कोणत्याही उत्पादनाला योग्य परिमाणांवर जोखलं जातं. भारतात बीआयएस उत्पादनांच्या गुणवत्ता जोखून घेते. सोनं-चांदी हॉलमार्क आहे म्हणजेच त्याची शुद्धता प्रमाणित आहे. परंतु, अनेक ज्वेलर्स संपूर्ण प्रक्रियेशिवाय हॉलमार्क लावत आहेत. अशामध्ये हॉलमार्क खरा आहे की नाही? हे पाहणंही गरजेचं आहे. खऱ्या हॉलमार्कवर भारतीय मानक ब्युरोचा त्रिकोणी निशाण असतं. त्यावर हॉलमार्किंग सेंटरच्या लोगोसोबत शुद्धताही लिहिलेली असते. त्याचसोबत ज्वेलरीचं निर्मिती वर्ष आणि उत्पादकाचा लोगोही असतो.
किती शुद्ध असतं सोनं?
सोनं - शुद्धता
24 कॅरेट - 99.9
23 कॅरेट - 95.8
22 कॅरेट - 91.6
21 कॅरेट - 87.5
18 कॅरेट - 75.0
17 कॅरेट - 70.8
14 कॅरेट - 58.5
9 कॅरेट - 37.5
24 कॅरेट सोन्याचे दागिने?
खरंखुरं आणि शुद्ध सोनं 24 कॅरेटचं असतं. परंतु, त्याचे दागिने मात्र बनवता येत नाहीत. कारण ते खूपच मऊसर असतं. साधारणत: दागिन्यांसाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर केला जातो. यामध्ये 91.66 टक्के सोनं असतं. हॉलमार्कवर पाच आकडे असतात. सर्व कॅरेटचं हॉलमार्क वेगळा असतो. 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 वर 750 लिहिलेलं असतं.
अॅसिड टेस्ट
काही केमिकल आणि अॅसिड असे असतात ज्यामुळे सोन्याची गुणवत्ता ओळखता येते. सोन्याच्या संपर्कात आल्यानंतरही यावर कोणताही परिणाम होत नाही. परंतु, अशुद्ध सोन्याच्या संपर्कात आल्यानंतर त्यांच्यावर प्रतिक्रिया दिसून येते.
शुद्धता प्रमाणपत्र घ्यायला विसरू नका
सोनं खरेदी करताना शुद्धता प्रमाणपत्र घ्यायला विसरू नका. सर्टिफिकेटमध्ये सोन्याची कॅरेट क्वालिटीही जरूर चेक करा. सोबतच सोन्यात जोडलेल्या जेम स्टोनसाठीही वेगळं सर्टिफिकेट जरूर घ्या.
जीएसटीसहीत बिल घ्या
दागिने किंवा कॉईन खरेदी करताना पक्कं बिल जरूर घ्या. बिलात सोन्याचं कॅरेट, शुद्धता, मेकिंग चार्ज, हॉलमार्क याचा उल्लेख असेल याची खात्री करून घ्या.