नवी दिल्ली : देशात आजपासून अत्यावश्यक अन्नपदार्थ व खाजगी रूग्णालयातील उपचारांवर जीएसटी लावण्याचा निर्णय घेतल्याचा सर्वसामान्यांना फटका बसला असताना आता खाद्यतेलाच्या दरात कपात केल्याने काहिसा दिलासा देखील मिळाला आहे. गेल्य़ा काही महिन्यांपुर्वी तेलाच्या किंमतीने उच्चांक गाठला होता. त्यामुळे सर्वसामान्यांना महागाईची झळ बसत होती. मात्र आता हे दर खाली आल्याने सर्वसामान्यांना काहिसा दिलासा मिळाला आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या काही दिवसांपुर्वी तेल कंपन्यांकडून दर कमी करण्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार धारा ब्रँड अंतर्गत खाद्यतेल विकणाऱ्या मदर डेअरीने सोयाबीन आणि राईस ब्रान ऑइलच्या किमतीत 14 रुपयांनी कपात केली होती. त्यानंतर आता फॉर्च्युन ब्रँड अंतर्गत उत्पादन विकणारी खाद्य तेल कंपनी अदानी विल्मारने आंतरराष्ट्रीय तेलाच्या किमती कमी झाल्यानंतर दर कमी करण्याचे सांगितले आहे. खाद्यतेलाच्या दरात प्रतिलिटर 30 रुपयांनी कपात करण्याची घोषणा कंपनीकडून करण्यात आली होती.


सोयाबीन तेलात सर्वात मोठी कपात
सोयाबीन तेलाच्या दरात सर्वात मोठी कपात करण्यात आली आहे. नवीन किमतीसह माल लवकरच बाजारात येण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. खाद्यतेलाच्या किमतींवर चर्चा करण्यासाठी अन्न मंत्रालयाने ६ जुलै रोजी बैठक बोलावली होती. यादरम्यान सर्व खाद्यतेल कंपन्यांना जागतिक स्तरावर दरात झालेल्या घसरणीचा फायदा ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.


तेलाचे नवीन दर 
फॉर्च्युन सोयाबीन तेलाची किंमत 195 रुपये प्रति लिटरवरून 165 रुपये प्रति लीटर झाली आहे. सूर्यफूल तेलाची किंमत 210 रुपये प्रति लीटरवरून 199 रुपये प्रति लीटर झाली आहे.फॉर्च्युन राईस ब्रान ऑइलची किंमत 225 रुपये प्रति लीटरवरून 210 रुपये प्रति लीटर करण्यात आली आहे. मोहरीच्या तेलाची कमाल किरकोळ किंमत 195 रुपये प्रति लिटरवरून 190 रुपये प्रति लीटर इतकी कमी करण्यात आली आहे.


दरम्यान या कपातीमुळे सर्वसामान्य कुटूंब आता तेल खरेदी करू शकणार आहे. तेलाचे दर कमी झाल्याने त्याला दिलासा मिळाला आहे.