गैरहजर राहिले म्हणून `ईद`च्या दुसऱ्या दिवशी पाच शिक्षकांचं निलंबन
गेल्या वर्षी जम्मूतल्या सरकारी आणि खासगी शाळांना दिवाळीच्या मुहूर्तावर `पूजा हॉलिडे`च्या नावानं पाच दिवसांची सुट्टी जाहीर करण्यात आली होती
काश्मीर : भारतात सर्वत्र 'ईद उल फित्र' साजरी केला जात असतानाच काश्मीरमध्ये मात्र शाळेत गैरहजर राहिलेल्या शिक्षकांना ईदच्या दुसऱ्या दिवशी निलंबित करण्यात आलंय. यानंतर काश्मीर खोऱ्यातील 'राजकारणा'वर नेटिझन्सकडून टीका करण्यात येतेय. हा 'छळ' असल्याचं काहीचं म्हणणं आहे. उल्लेखनीय म्हणजे, गेल्या वर्षी जम्मूतल्या सरकारी आणि खासगी शाळांना दिवाळीच्या मुहूर्तावर ५ नोव्हेंबर ते ९ नोव्हेंबर २०१८ पर्यंत 'पूजा हॉलिडे'च्या नावानं पाच दिवसांची सुट्टी जाहीर करण्यात आली होती.
काश्मीरमधल्या 'ग्रेटर काश्मीर' या वृत्त संकेतस्थळानं दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी काश्मीरमधल्या काही शाळांत सरकारी शिक्षण अधिकाऱ्यांनी अचानक भेट दिली. यानंतर कामावर हजर नसलेल्या पाच शिक्षकांना 'अनधिकृत अनुपस्थिती'चं कारण देत तातडीनं निलंबन करण्याचे आदेश श्रीनगरचे मुख्य कार्यकारी अधिकारी मलिक नासिर यांनी दिले.
यानंतर सोशल मीडियावर मात्र वाद उभा राहिला. 'इतर विभागाचे कर्मचारी ईद साजरा करत असताना शिक्षण विभागाकडून मात्र आपल्या कर्मचाऱ्यांचा छळ सुरू आहे. सरकारनं या विभागाचा विनोद करून टाकलाय' अशी प्रतिक्रिया जे. के. पीपल्स मूव्हमेंटचे अध्यक्ष (जेकेपीएम) आणि माजी आयएएस अधिकारी डॉ. शाह फैसल यांनी सोशल मीडियावर व्यक्त केलीय.