ईद मुबारक! हे पर्व सर्वांना आरोग्यदायी जावो; पंतप्रधानांच्या शुभेच्छा
ईदचं पर्व असतानाही देशातील बहुतांश मशीद राहणार बंद
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ईद उल फित्रच्या निमित्तानं देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. Eid Mubarak ईद मुबारक, असं म्हणत मोदींनी देशवासियांना उद्देशून एक ट्विट करत त्या माध्यमातून आपल्या शुभेच्छा सर्वांपर्यंत पोहोचवल्या. रमजानच्या पवित्र महिन्यात रोजाचे उपवास ठेवल्यानंतर, सर्वत्र आज ईदचं पर्व साजरा होत आहे. पण, या पर्वाला कोरोना विषाणूच्या संकटाचं गालबोट लागलं आहे. परिणामी यंदा देशभरात ईद अगदी साधेपणानंच साजरा होत आहे.
कोविड 19 चा प्रादुर्भाव पाहता देशभरातीत अनेक मशीदही बंद ठेवण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. संकटाच्या याच वेळी मोदींनी अतिशय सकारात्मक अशा शुभेच्छा देत देशवासियांना दिलासा दिला आहे. यंदाच्या वर्षी ईदच्या निमित्तानं करुणा, बांधिलकी आणि एकात्मतेच्या भावनेनं हे पर्व साजरा करुया असं म्हणत मोदींनी सर्वांसाठी आरोग्य आणि भरभराटीची कामना करत या क्षणाच्या शुभेच्छा दिल्या.
दरम्यान, ईदचं अतिशय महत्त्वाचं पर्व पाहता दरवर्षी या दिवशी असणारा उत्साह यंदा बऱ्याच अंशी शमलेला असेल. कोरोनाचं सावट असल्यामुळं दिल्लीतील जामा मशीदही बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वीच दिल्ली, मुंबई आणि इतरही ठिकाणी मुस्लिम धर्मीयांकडून ईदच्या निमित्तानं घराबाहेर न पडता घरात राहूनच या दिवसाची नमाज अदा करण्याचं आवाहन करण्यात आलं. शिवाय सोशल डिस्टन्सिंगचंही पालन करण्याचं आवाहन सर्वांनाच करण्यात आलं.
ईदच्या निमित्ताने प्रतिवर्षीप्रमाणे उत्साही वातावरण दिसणार नसलं तरीही सामाजिक बांधिलकी जपत हा सण अनोख्या पद्धतीनं साजरा करण्याकडेही अनेकांचा कल दिसत आहे. त्यामुळं यंगा खऱ्या अर्थानं ईद सर्वांसाठी बरकत आणेल आणि येत्या काळात या संकटावर मात करण्याचीही ताकद देऊन जाईल अशी प्रतिक्रिया सर्व स्तरांतून देण्यात येत आहे.