नवी दिल्ली : देशभरात रमजानचा पवित्र महिना साजरा होत आहे. आज चंद्र दर्शन झालं असून उद्या म्हणजेच सोमवारी संपूर्ण भारतात ईद-उल-फितरचा सण साजरा करण्यात येणार आहे. जामा मशिदीचे शाही इमाम सैयद अहमद बुखारी यांनी चंद्र दर्शन झालं असून संपूर्ण भारतात 25 मे रोजी ईदचा सण साजरा होणार असल्याचं सांगितलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ईद-उल-फितरचा सण रमजानचा महिना पूर्ण झाल्यावर, 30 रोजे झाल्यानंतर, चंद्र दर्शन करुन साजरा केला जातो. जगभरात मुस्लिम बांधव हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात.


मात्र, यंदा देशात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन आहे. लॉकडाऊनमध्ये सर्वच धार्मिक स्थळं बंद आहे. त्यामुळे मुस्लिम बांधवही घरातच नमाज पठण करणार आहेत. यावेळी सोशल डिस्टंन्सिंगचं पालन करत, सार्वजनिकरित्या एकत्र न येता ईदच्या शुभेच्छा द्या, असं सांगण्यात आलं आहे. मुस्लिम धर्मगुरु आणि मौलवींकडूनही सर्वांना घरातच ईद साजरी करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. 


दरम्यान, केरळ आणि जम्मू-काश्मीरमध्ये शनिवारी चंद्र दर्शन झाल्याने तेथे आज रविवारीच ईद साजरी करण्यात येत आहे.


सौदी अरब, यूएईसह अनेक आखाती देशांमध्ये चंद्र दर्शन झाल्यानंतर 24 मे रोजीच ईद साजरी करण्यात आली. मात्र भारतात 24 मे रोजी चंद्र दर्शन झाल्यानंतर आता 25 मे रोजी ईदचा सण साजरा होणार आहे.