नवी दिल्ली: शेतकरी विधेयकांवरील चर्चेवेळी राज्यसभेत  नियमांचे उल्लंघन करणे आणि गोंधळ घातल्याप्रकरणी आठ खासदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. केंद्र सरकारकडून रविवारी राज्यसभेत वादग्रस्त शेती विधेयके मांडण्यात आली होती. विरोधी पक्षांकडून या विधेयकांना कडाडून विरोध करण्यात आला. त्यावेळी काही खासदारांनी सभागृहाच्या वेलमध्ये येऊन गोंधळ घातला होता. तर तृणमुल काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन यांनी उपसभापतींच्या टेबलावरील नियमावली पुस्तिका फाडून टाकली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केंद्रीय मंत्र्यांकडून राज्यसभेच्या उपसभापतींची पाठराखण, विरोधकांवर टीका



खासदारांच्या या वर्तनावर राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. उपसभापतींशी शारीरिक झटापट करण्यात आली. त्यांच्या कामात अडथळे आणण्याचा प्रयत्न झाला. हा राज्यसभेच्या इतिहासातील वाईट दिवस होता. ही गोष्ट दुर्दैवी आणि निषेधार्ह असल्याचे खडे बोल व्यंकय्या नायडू यांनी खासदारांना सुनावले. 


मोदी सरकारला मोठे यश; अखेर राज्यसभेत दोन कृषी विधेयकांना मंजुरी



यानंतर व्यंकय्या नायडू यांनी डेरेक ओब्रायन, राजीव सातव, के.के. रागेश, रिपून बोरा, डोला सेन, सय्यद नाझीर हुसेन आणि एलामरन करीम या आठ खासदारांना एक आठवड्यासाठी निलंबित केले. यावेळी विरोधकांनी उपसभापतींविरोधात अविश्वास ठरावही मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र, व्यंकय्या नायडू यांनी हे नियमाविरोधात असल्याचे सांगत ही मागणी फेटाळून लावली.