नवी दिल्ली : राज्यसभेत कृषी संबंधित दोन विधेयके आवाजी मतदानाने मंजूर झाली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी इतिहासातील एक मोठा दिवस असल्याचे आज म्हटलं आहे. आज राज्यसभेत मोठा गदारोळ झाला आणि विरोधी पक्षातील खासदारांनी राज्यसभेच्या उपसभापतींचा अनादर देखील केला. ज्यावर केंद्र सरकारच्या 6 मंत्र्यांनी पत्रकार परिषद घेतली. यामध्ये राजनाथ सिंह, प्रकाश जावडेकर, प्रह्लाद जोशी, पियुष गोयल, थावरचंद गहलोत आणि मुख्तार अब्बास नकवी यांचा समावेश होता.
विरोधकांवर निशाणा साधताना राजनाथ सिंह यांनी राज्यसभेचे उपसभापती हरिवंश नारायण सिंह यांचा अनादर करण्याच्या मुद्दयावर प्रतिक्रिया देत म्हटले की, ही घटना अगदी चुकीची आहे. असे केले जाऊ नये. संसदीय मर्यादेचे उल्लंघन केले गेले. उपसभापतींची चुकीच्या पद्धतीने व्यवहार झाला. सीटवर उभे राहणे, नियमावली पुस्तक फाडणे हे फार वाईट घडले. यामुळे केवळ त्यांची प्रतिष्ठाच नाही तर संसदीय लोकशाहीलाही इजा पोहोचली आहे.
राजनाथ सिंह म्हणाले की, 'आज राज्यसभेत दोन कृषी विधेयकावरील चर्चेदरम्यान, काही विरोधी नेते संसदेत ज्या प्रकारे वागले ते अत्यंत खेदजनक, दुर्दैवी आणि लाजिरवाणे होते. आजपर्यंत भारताच्या संसदीय इतिहासामध्ये अशी घटना घडली नव्हती. सभागृहाच्या समोर सभागृहाचे नियमपत्र फोडले गेले, माईक तोडला गेला आणि आसणावर चढून अशोभनीय कृत्य केले गेले.'
राजनाथ सिंह म्हणाले, 'आज राज्यसभेतील अशोभनीय वर्तनामुळे निश्चितच संसदीय सन्मान नष्ट झाला आहे. संसदीय लोकशाहीमध्ये मर्यादेला खूप महत्वाचे स्थान आहे. जेव्हा संसदीय निकष मोडतात, तेव्हा लोकशाहीची परंपरेला देखील ठेस लागते. विरोधी पक्षातील काही खासदारांनी उपसभापतींसोबत ज्या प्रकारे वर्तन केले त्याचा मी निषेध करतो.'
Rajya Sabha: TMC MP Derek O'Brien entered the well and showed the House rule book to Rajya Sabha Deputy Chairman Harivansh, during discussion in the House on agriculture Bills pic.twitter.com/OlTjJb6j4F
— ANI (@ANI) September 20, 2020
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी कृषी विधेयकावर म्हटले की, दोन्ही बिले ऐतिहासिक आहेत. केवळ दिशाभूल करणार्या तथ्यांच्या जोरावर शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या विधेयकामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल. शेतकर्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या दिशेने हे एक मोठे पाऊल आहे. एमएसपी आणि एपीएमसी रद्द केली जात नाहीये.
टीएमसीचे खासदार डेरेक ओ ब्रायन यांनी उपसभापतींसमोर जावून नियमावली पुस्तक फाडले. डेरेक ओ ब्रायन आणि तृणमूल काँग्रेसच्या उर्वरित खासदारांनी सीटवर जाऊन इतर खासदारांच्या समोर नियमावली पुस्तिका फाडल्या. टीएमसीचे खासदार डेरेक ओ ब्रायन यांनी सरकारवर फसवणूक केल्याचा आरोप केला.