कानपूर: उत्तर प्रदेशातील कानपूर येथे गुन्हेगारांशी झालेल्या धुमश्चक्रीत आठ पोलिसांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर आणखी चार पोलीस गंभीररित्या जखमी झाले आहेत. येथील डिकरु गावात हा प्रकार घडला. काल रात्री पोलिसांचे एक पथक विकास दुबे या कुख्यात गुंडाला पकडण्यासाठी गेले होते. सुरुवातीला पोलिसांच्या गाड्या अडवण्यासाठी गुंडांनी जेसीबी उभा करुन रस्ता अडवला. यानंतर पोलीस जेव्हा गाड्यांमधून बाहेर आले त्यावेळी जवळपास १५ ते १६ गुंडांनी छतावरून पोलिसांवर अंदाधुंद गोळीबार केला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोलिसांकडून या गोळीबाराला प्रत्युत्तर देण्यात आले. मात्र, गुंड उंचावरुन गोळीबार करत असल्याने त्याचा फायदा झाला नाही. त्यामुळे आठ पोलिसांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये उप पोलीस अधीक्षक देवेंद्र मिश्रा,  तीन उपनिरीक्षक आणि चार कॉन्स्टेबलचा समावेश आहे. 

या घटनेनंतर वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. सध्या डिकरू गावात फॉरेन्सिक टीमही तपास करत आहे. याशिवाय, पोलिसांची अतिरिक्त कुमक गावात तैनात करण्यात आली आहे. विकास दुबेला शोधून काढण्यासाठी पोलिसांनी जवळपास १०० मोबाईल फोन ट्रेसवर टाकले आहेत. अनेकांची चौकशी करण्यात आली आहे. 



दरम्यान, या चकमकीत जखमी झालेल्या चार पोलीस कर्मचाऱ्यांची प्रकृतीही गंभीर असल्याचे समजते. गुंडांनी चकमकीनंतर पोलिसांचे शस्त्रेही पळवून नेली आहेत. या घटनेमुळे उत्तर प्रदेशात मोठी खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तातडीने या घटनेचा अहवाल मागवला आहे.