मुंबई : एकनाथ शिंदे आणि बंड पुकारल्याने महाविकास आघाडीसमोर राजकीय संकट उभ ठाकलंय. हे सर्व बंडखोर उमेदवार गुवाहाटीच्या एका हॉटेलमध्ये ठाण मांडून बसले आहेत. या बंडखोर आमदारांना आता  Z सुरक्षा पुरवण्यात येणार असल्याची सुत्रांची माहिती आहे. त्याचबरोबर या आमदारांच्या सुरक्षेची जबाबदारी सीआरपीएफकडे देखील देण्यात आली आहे. केंद्राने या संदर्भातला निर्णय घेतला आहे. त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एकनाथ शिंदे गटातील 12 बंडखोर आमदारांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पत्र लिहून कुटुंबाची सुरक्षा धोक्यात असल्याची तक्रार केली होती. या तक्रारीची दखल राज्यपालांनी घेतली आहे. राज्यपाल कोश्यारी यांनी हा प्रस्ताव केंद्रीय गृहमंत्रालयाकडे पाठवला होता. या प्रस्तावावर आता गृहमंत्रालय निर्णय घेणार आहे.  


 आमच्या आमदारांच्या कुटुंबियांची सुरक्षा काढून घेतली असल्याचा आरोप एकनाथ शिंदे यांनी करत नाराजी व्यक्त केली होती. तसेच कुटुंबाची सुरक्षा धोक्यात असल्याची तक्रार करत सुरक्षेची मागणी करण्यात आली होती. केंद्राकडून CRPF सुरक्षा देण्यात येऊ शकते याची चाचपणी सुरू झाल्याची सूत्रांकडून माहिती मिळतेय... पुढच्या काळात बंडखोर आमदारांच्या घरावरही हल्ले होऊ शकतात त्यात आमदारांच्या कुटुंबियांना सुद्धा त्रास होऊ शकतो म्हणून ही सुरक्षा व्यवस्था देण्यात येऊ शकते.. या बाबतची चाचपणी केंद्राकडून सुरू असल्याची ही माहिती आहे... एकनाथ शिंदे यांच्याकडून आरोप केल्यानंतर सुरक्षा काढली नाही अशी माहिती राज्याच्या गृह मंत्र्यांनी दिली होती, मात्र तरीसुद्धा गोंधळ होऊ नये म्हणून आता केंद्राकडून या बंडखोर आमदारांना आणि त्यांच्या कुटुंबियांना सुरक्षा मिळण्याची शक्यता आहे.  


आता केंद्राकडून या 12 बंडखोर आमदारांना Z दर्जाची सुरक्षा पुरवण्यात येणार असल्याची सुत्रांची माहिती आहे. तसेच सीआरपीएफकडे देखील या आमदारांची सुरक्षा पुरवण्यात आली आहे. अनेक आमदारांच्या घरासमोर आता सीआरपीएफ तैनात झाले आहेत. तसेच आजपासून या आमदारांना ही सुरक्षा पुरवण्यात येणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे या बंडखोर आमदारांना मोठा दिलासा मिळाला आहे तर ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसलाय.  


शिंदे गटाची बैठक सुरु
गुवाहाटी हॉटेलमध्ये उपस्थित बंडखोर आमदारांची बैठक सुरू झाली आहे. या बैठकीत पुढील रणनीती आणि कायदेशीर बाबींवर एकनाथ शिंदे गट चर्चा करत असल्याचे सांगण्यात येत आहे. दुसरीकडे, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिंदे गट आज दुसरी बैठक आयोजित करू शकते.