उत्तर प्रदेशात काँग्रेसशिवाय महाआघाडी, अखिलेश यादव यांची घोषणा
उत्तर प्रदेशात काँग्रेसच्या महाआघाडीला धक्का बसला आहे. समाजवादी पार्टीने स्वतंत्र निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. तसे स्पष्ट संकेत अखिलेश यादव यांनी दिलेत.
लखनऊ : उत्तर प्रदेशात काँग्रेसच्या महाआघाडीला धक्का बसला आहे. समाजवादी पार्टीने स्वतंत्र निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. तसे स्पष्ट संकेत माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी दिलेत. भाजप आणि काँग्रेस सोडून आम्ही आगामी निवडणुकीसाठी आघाडीसाठी प्रयत्नशील आहोत, असे अखिलेश यांनी म्हटलेय. दरम्यान, समाजवादी पार्टीने असा निर्णय का घेतला, याचे उत्तरही अखिलेश यांनी दिलेय.
मध्य प्रदेशमध्ये भाजपचे सरकार उलथवून काँग्रेसने बाजी मारली. मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसचे सरकार आले. मात्र, बहुमत नसल्याने समाजवादी पार्टी आणि मायावती यांच्या बसपने काँग्रेसला पाठिंबा दिला. त्यामुळे मध्य प्रदेशात काँग्रसचे सरकार स्थापन झाले. मात्र, मंत्रिमंडळात समाजवादी पार्टीला स्थान न मिळाल्याने पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव नाराज आहेत. त्यांनी ही नाराजी बोलून दाखवताना बिगर भाजप आणि बिगर काँग्रेस अशी उत्तर प्रदेशात महाआघाडी असेल. त्यामुळे भाजप आणि मोदींविरोधात रान उठविणाऱ्या काँग्रेससोबत आता समाजवादी पार्टी नसणार आहे. त्यामुळे हा काँग्रेसला हा मोठा झटका मानला जात आहे.
भाजपने मोठ मोठी आश्वासने देऊन उत्तर प्रदेशात सत्ता स्थापन केली. मात्र, भाजपने खोटी आश्वासने दिली आहेत. कोणतीही कामे केलेली नाहीत. जाती-जातीमध्ये तेढ वाढविले. धर्माच्या नावावर मते मागितली. मात्र, आपल्या समोर काय आले? भाजपने खोटे बोलून समाजवादी पार्टीचे सरकार घालविले. आता काँग्रेसने मध्य प्रदेशमध्ये सरकार स्थापन करताना मंत्रिमंडळात समाजवादी पार्टीला सहभागी करुन घेतलेले नाही. भाजप आणि काँग्रेसने आपला इरादा स्पष्ट दाखवून दिलाय. त्यामुळे यापुढे आम्ही त्यांच्यासोबत नसणार आहोत. आम्ही आघाडीसाठी प्रयत्न सुरु ठेवणार आहोत, असे अखिलेश यांनी यावेळी स्पष्ट केले. निवडणुकीच्याआधी काँग्रेसने आपला इरादा स्पष्ट केल्याने त्यांना धन्यवाद. तसेच भाजपचाही आभारी आहे, असे ते म्हणालेत.
तिसऱ्या आघाडीसाठी तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव प्रयत्न करत आहेत. त्यांच्या आघाडीचे आपण समर्थन करतो. आपण लवकरच वेळ काढून चंद्रशेखर राव यांना हैदराबादमध्ये भेटायला जाणार आहोत, असे अखिलेश यांनी स्पष्ट केले. स्थानिक पक्षांना एकत्र करुन पुढील निवडणूक लढण्याचा इरादा अखिलेश यांनी यावेळी बोलून दाखवला. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत अखिलेश यादव हे भाजप आणि काँग्रेस सोडून अन्य राजकीय पक्षांशी आघाडी करुन लढवतील अशी शक्यता अधिक आहे.