Eci : ठाकरे गटाकडे उरले अवघे काही तास, निवडणूक आयोगाचा अल्टिमेटम
खरी शिवसेना (Shiv Sena) कुणाची याचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी निवडणूक आयोगानं (election commission of india) हालचालींना सुरुवात केलीय. त्यासाठी निवडणूक आयोगानं शिवसेना आणि शिंदे गटाकडून पुन्हा एकदा कागदपत्रं मागवलीयेत.
मुंबई : खरी शिवसेना (Shiv Sena) कुणाची याचा फैसला आता अवघ्या 10 दिवसात होऊ शकतो. कारण निवडणूक आयोगानं (Election Commission Of India) 7 ऑक्टोबरपर्यंत कागदपत्रं जमा करण्याचा फायनल अल्टिमेटम ठाकरे (Uddhav Thacekray) आणि शिंदे गटाला (Eknath Shinde Group) दिलाय. खरी शिवसेना कुणाची याचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी निवडणूक आयोगानं हालचालींना सुरुवात केलीय. त्यासाठी निवडणूक आयोगानं शिवसेना आणि शिंदे गटाकडून पुन्हा एकदा कागदपत्रं मागवलीयेत. त्यासाठी 7 ऑक्टोबरपर्यंतची मुदत देण्यात आलीय. (election commission of india give altimate to shinde and thackeray group for document till 7 october)
विशेष म्हणजे याच दिवशी अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करायला सुरुवात होतेय. तर 14 ऑक्टोबर ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत आहे. त्यामुळे या सात दिवसातच निवडणूक आयोग शिवसेनेच्या पक्षचिन्हाबाबत अंतिम निर्णय देऊ शकतो. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वीच शिवसेनेचा धनुष्यबाण कोणाचा, याचा फैसला झाला तर अंधेरी पोटनिवडणुकीची राजकीय समीकरणे 360 अंशांमध्ये बदलू शकतात. त्यामुळे आता या सात दिवसांत निवडणूक आयोग महत्त्वाचा निर्णय देणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.
सुप्रीम कोर्टात घटनापीठासमोर सध्या महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा खटला सुरु आहे. घटनापीठाने धनुष्यबाण चिन्हाबाबत निर्णय घेण्याचे आदेश निवडणूक आयोगाला मागच्या सुनावणीमध्ये दिले होते. त्यानुसार आता घडामोडींना वेग आलाय. सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्देशांनंतर आता निवडणूक आयोगही कामाला लागलंय. दुसरीकडे निवडणूक चिन्हं आणि अंधेरी पोटनिवडणुकीवरुन शिंदे गटानं ठाकरेंना धक्का द्यायची तयारी सुरु केलीय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार..
शिंदेचा ठाकरेंना 'असा' दणका?
अंधेरी पोटनिवडणुकीसाठी शिंदे गटाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला जाऊ शकतो. याच निवडणुकीसाठी धनुष्यबाण चिन्हं मिळावं म्हणून शिंदे गट सुप्रीम कोर्टात जाऊ शकतो. धनुष्यबाण चिन्हावर लढणा-या ठाकरे गटाला शिंदे गट आक्षेप घेऊ शकतो. शिंदे गटाच्या लिगल टीमच्या बैठकीत या मुद्द्यावर खल झाला. शिंदे गटानं उमेदवार दिला तर कोर्टाच्या लढाईत बाजू मांडायला फायदा होईल.एका चिन्हावर दोन उमेदवार दिल्याने पेच निर्माण होईल. यामुळे धनुष्यबाण चिन्ह गोठवलं जाईल किंवा आयोगाला ठोस निर्णय घ्यावा लागेल.
अशी शिंदे गटाची रणनीती आहे. त्यामुळेच शिंदे गटानं अजूनही भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याची अधिकृत घोषणा केलेली नाही. शिंदेंच्या बंडानंतर मुंबईतील अंधेरी पूर्व मतदारसंघात होणारी पहिली पोटनिवडणूक आहे. या निवडणुकीतील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे धनुष्यबाण चिन्ह कोणाला मिळणार. सहसा निवडणूक तोंडावर आली असेल तर आयोग वादात असलेलं चिन्ह गोठवून दोन्ही बाजूंना नवीन चिन्ह देत असतं. त्यामुळे 7 ऑक्टोबरला कागदपत्रे सादर झाल्यावर निवडणूक आयोग काय निर्णय घेतणार याची उत्कंठा लागलीय.