नवी दिल्ली : निवडणूक आयोगाची दुपारी १२ वाजता पत्रकार परिषद होणार आहे. देशातील तीन राज्यांच्या होणाऱ्या निवडणुकांमुळे या पत्रकार परिषदेमुळे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. तसेच महाराष्ट्र आणि हरियाणा राज्यातल्या विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम, निवडणूक आयोगाकडून आज जाहीर केला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे या पत्रकार परिषदेत काय घोषणा होणार याची उत्सुकता आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्र राज्यात विधानसभा निवडणुका कधी होणार, निवडणुकांचा कार्यक्रम काय असेल याची उत्सुकता सगळ्यांनाच लागली आहे. काल निवडणूक अधिकाऱ्यांची बैठक झाली. महाराष्ट्रासह झारखंड आणि हरियाणा या राज्यातही विधानसभा निवडणुका होत आहेत. तीन्ही राज्यांत निवडणूक आयोगाच्या पथकाने पाहणी करून अहवाल सादर केला आहे. त्यानंतर काल निवडणूक आयोगाने आढावा घेतला होता. 



निवडणूक आयोगाच्या पथकाने दोन्ही राज्यांचा दौरा केला आणि तेथील तयारीचा आढावा घेतला. सूत्रांच्या माहितीनुसार हरियाणा आणि महाराष्ट्रात ऑक्टोबरच्या दुसर्‍या आणि तिसर्‍या आठवड्यात निवडणुका होणार आहेत. हरियाणामध्ये पहिल्या टप्प्यात निवडणुका अपेक्षित आहेत, तर महाराष्ट्रात २ ते ३ टप्प्यात मतदान होण्याची शक्यता आहे. तथापि, झारखंडमधील विधानसभा निवडणुका या दोन राज्यांसबोत होणार नाहीत, असे सांगितले जात आहे.


निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार झारखंडमध्ये निवडणुका घेण्यास वेगवेगळ्या अटी आहेत. आता झारखंड विधानसभेची मुदत संपायला तीन महिन्यांहून अधिक कालावधी आहे. झारखंडमध्ये विधानसभा निवडणुका डिसेंबरमध्ये होणार आहेत. कारण तेथे विधानसभा स्थापनेची तारीख जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात आहे. तिन्ही राज्यात भाजपची सत्ता आहे.