Nagaland Tripura Meghalaya Exit Poll 2023: त्रिपुरा (Tripura), मेघालय (Meghalaya) आणि नागालँड (Nagaland) विधानसभा निवडणुकीचा येत्या 2 मार्चला निकाल लागणार आहे. त्रिपुरा राज्यात 16 फेब्रुवारीला मतदान झालं. तर नागालँड आणि मेघालय विधानसभा निवडणुकीसाठी 27 फेब्रुवारीला मतदान पार पडलं. या तिनही राज्यांच्या निवडणुकीचा निकाल 2 मार्चला जाहीर करण्यात येणार आहेत. त्याआधी तिन्ही राज्यांच्या निकालाचे एक्झिट पोल (Exit Poll) समोर आले आहे.


त्रिपुरामध्ये भाजपची नवी रणनीती यशस्वी होणार?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संपूर्ण देशात अजूनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जादू कायम असल्याचे दिसत आहे. त्याचप्रमाणे त्रिपुरामध्ये देखील भाजपचं वर्चस्व कायम आहे. यंदाच्या त्रिपुरा विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री माणिक साहा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चेहऱ्यावर निवडणूक लढली. विशेष म्हणजे मुख्यमंत्री माणिक साहा यांची ही रणनीती यशस्वी होताना दिसत आहे. त्यामुळे त्रिपुरामध्ये भाजपचा विजयी रथ रोखण्यात काँग्रेससह डाव्यांना अपयश येताना दिसत आहे.


त्रिपुरामध्ये पुन्हा एकदा भाजप (BJP) सरकार येण्याची चिन्ह आहेत. Exit Poll नुसार भाजपला इथं स्पष्ट बहुमत मिळू शकतं. त्रिपुरा विधानसभेत भाजपाला 45  टक्के मतं मिळू शकतात. तर लेफ्ट-काँग्रेसला आघाडीला 32 टक्के मतं मिळण्याची शक्यता आहे. टीएमपीला 20 टक्क्यांपर्यंत मत मिळण्याची शक्यता आहे. एक्झिट पोलनुसार त्रिपुरामध्ये भाजपाला 29-36 जागा मिळतील. सीपीएम+ ला 13-21, TIPRA  11-16 आणि अपक्षांना 0-3 जागा मिळू शकतात.


काय सांगतात एक्झिट पोलचे अंदाज...


'अॅक्सिस माय इंडिया' आणि 'आजतक'च्या एक्झिट पोलनुसार, त्रिपुरा विधानसभा निवडणुकीत भाजपच वर्चस्व कायम राहाणार आहे. भाजपला विधानसभेच्या 60 पैकी 36 ते 45 जागा मिळतील. तर डावे-काँग्रेसच्या आघाडीच्या खात्यात केवळ 9 ते 11 जागा मिळतीत. तर विशेष म्हणजे त्रिपुराच्या राजकारणात एक प्रमुख राजकीय शक्ती उदयास येत असल्याचं चित्र आहे. म्हणजेच त्रिपुराच्या राजेशाही घराणे टिपरा मोथा प्रद्योत बर्मन यांना 9 ते 16 जागा मिळताना दिसत आहेत.


डावे-काँग्रेसला 2018 च्या तुलनेत कमी जागा..


त्रिपुरा विधानसभा निवडणुकीत भाजप विरुद्ध डावे-काँग्रेस अशी जोरदार लढत पाहायला मिळाली. भाजपला टक्कर देण्यासाठी डावे आणि काँग्रेसनं तब्बल 25 वर्षे जुनं राजकीय वैर विसरून ते एकत्र आले आहेत. परंतु, त्यादेखील फारसा परिणाम झाल्याचं दिसत नाही. कारण, प्रसिद्ध झालेल्या एक्झिट पोलच्या अंदाजानुसार, सन 2018 च्या तुलनेत डावे- काँग्रेसच्या आघाडीला कमी जागा मिळताना दिसत आहेत.


मेघालयमध्ये कसं असेल चित्रसत्तेवर?


मेघालय विधानसभेत 60 जागा आहेत. भाजप आणि काँग्रेस हे दोन्ही राष्ट्रीय पक्ष स्वबळावर लढत असले तर कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळत नसल्याचं चित्र आहे. एक्झिट पोलनुसार इथे भाजपला 6-11 जागा मिळू शकतात. याशिवाय एनपीपीला सर्वाधिक 21-26 जागा मिळू शकतात. टीएमसी 8-13, काँग्रेस 3-6 आणि इतर पक्षांना 10-19 जागांवर समाधान मानावं लागेल.


दुसरीकडे, काँग्रेसला पर्याय म्हणून पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जींच्या टीएमसीने मेघालयात प्रवेश केला होता. परंतु टीएमसीला आपली चमक दाखवता आली नाही. पण,  काँग्रेससाठी चांगलीच डोकेदुखी ठरली आहे, हे मात्र नक्की आहे. 


दरम्यान, सन 2018 मध्ये काँग्रेसला सर्वाधिक 21 जागा मिळाल्या होत्या. तर एनपीपीला 20 आणि भाजपला केवळ 2 जागांवर समाधान मानावे लागले होते. त्यामुळे त्रिशंकू ठरलेल्या विधानसभेत एनपीपी आणि भाजपच्या युतीने सत्ता स्थापन केली होती. 


नागालँडमध्येही भाजपचं वर्चस्व..


नागालँड विधानसभा निवडणुकीतही भाजपाची सत्ता येण्याची शक्यता एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आली आहे. भाजपला 35 ते 43 जागा मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय एनपीएफ 2-5, एनपीपी 0-1, काँग्रेस 1-3  आणि इतर पक्षांना 6-11 जागा मिळण्याची शक्यता आहे. त्यावरून  नागालँडमध्ये एनडीपीपीसोबत निवडणूक लढवण्याचा भाजपची खेळी यशस्वी ठरताना दिसत आहे. एक्झिट पोलनुसार, भाजप-एनपीपी युतीला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत आहे.