लोकसभा निकालानंतर पक्षाध्यक्षांसहीत काँग्रेस निराशेच्या गर्तेत
एकीकडे पक्ष संघटनेत व्यापक बदल करत असताना दोन राज्यांमधली सत्ता टिकवून ठेवण्याचं मोठं आव्हान काँग्रेससमोर
दीपक भातुसे, झी २४ तास, नवी दिल्ली : सलग दुसऱ्या लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवामुळे काँग्रेस पक्ष पुरता खचून गेलाय. त्यामुळे केंद्रासह अनेक राज्यांमध्ये संघटनात्मक बदल करतानाच हाती असलेली काही राज्यांची सत्ता वाचवण्याचं खडतर आव्हान काँग्रेस नेतृत्वासमोर आहे. हतबल नेते, गोंधळलेले कार्यकर्ते पक्षाला कसं सावरणार, हा प्रश्न आहे. लोकसभा पराभवातून कसं सावरायचं? कार्यकर्ते, नेत्यांचं मनोबल कसं वाढवायचं? राजस्थान, मध्य प्रदेशची सत्ता कशी टिकवायची? कर्नाटकमध्ये आमदारांची फोडाफोडी कशी थांबवायची? काँग्रेसला भेडसावणारे हे काही यक्षप्रश्न आहेत.
लोकसभा निवडणुकीतल्या दारूण पराभवानंतर पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी दिलेला राजीनामा फेटाळला गेला असला तरी त्यांचा विचार बदललेला नाही. गांधी घराण्याव्यतिरिक्त दुसऱ्या ज्येष्ठ नेत्याची अध्यक्षपदी निवड पक्षाला करावी लागणार आहे. एकीकडे पक्ष संघटनेत व्यापक बदल करत असताना दोन राज्यांमधली सत्ता टिकवून ठेवण्याचं मोठं आव्हान काँग्रेससमोर आहे. या दोन्ही राज्यांत लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे पुरतं पानिपत झालंय.
मध्य प्रदेशात ११४ आमदारांसह काँग्रेस सर्वात मोठा पक्ष आहे. त्या खालोखाल भाजपाचे १०९ आमदार आहेत. चार अपक्ष, दोन बसपा आणि एक सपा आमदारानं सध्या काँग्रेस सरकारला पाठिंबा दिलाय. मध्य प्रदेशमध्ये बहुमताचा आकडा ११६ असल्यानं यातल्या किमान दोघांचा पाठिंबा कमलनाथ यांच्यासाठी आवश्यक आहे.
दुसरीकडे काँग्रेसचेच काही आमदार भाजपाच्या संपर्कात असल्याचं वृत्त आहे. या पार्श्वभूमीवर कमलनाथ यांनी रविवारी रात्री पक्षाच्या आमदारांची बैठक बोलावली होती. यावेळी सर्व आमदारांनी आपण सोबत असल्याची हमी कमलनाथ यांना दिल्याचा दावा गृहमंत्री बाला बच्चन यांनी केला.
राजस्थानातही काँग्रेसला काठावरचं बहुमत आहे. २०० आमदारांच्या विधानसभेत काँग्रेसचे निम्मे आमदार आहेत. १ आमदार असलेला राजद सरकारमध्ये आहे. भाजपाचे ७३, बसपाचे ६, अपक्ष १३ तर इतर ७ आमदार निवडून आले आहेत. राजस्थानात बहुमता आकडा १०१ आहे. राजस्थानातही फोडाफोडीचं राजकारण खेळलं जाण्याची शक्यता असताना गेहलोत सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल, असा विश्वास त्यांचे मंत्री व्यक्त करतायत.
या सगळ्या गोंधळात दोन चिंता आणखी आहेत. कर्नाटकमध्ये जेडीएससोबत गेल्यानं पक्षाचा काहीच फायदा नसल्याची काँग्रेस आमदारांची भावना झालीये. अनेक आमदार संपर्कात असल्याचं भाजपा नेते उघडपणे सांगतायत. दुसरीकडे महाराष्ट्रात तीन-चार महिन्यांत निवडणुका आहेत. त्यामुळे इथंही पक्ष संघटनेमध्ये व्यापक फेरबदल करावे लागणार आहेत. या सगळ्या आव्हानांचा सामना काँग्रेस नेतृत्व कसं करतं, यावर पक्षाचं भवितव्य अवलंबून असेल.