घरातील विजेचे मीटर पुढल्या वर्षीपासून बदलणार, ग्राहकांचा फायदा
वीज वहन आणि वितरणातील गळतीला थांबवण्यासाठी याचा फायदा होणार आहे.
नवी दिल्ली - वीज बिल आणि ते भरण्याची कटकट यातून आता सामान्य माणसांची सुटका होणार आहे. कारण पुढल्या वर्षीपासून टप्प्याटप्प्याने घरातील मीटर स्मार्ट प्रीपेड करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. वहन आणि वितरणातील विजेची गळती थांबवण्यासाठी प्रीपेड मीटर बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे सरकारी निवेदनात म्हटले आहे. एक एप्रिल २०१९ पासून पुढील ३ वर्षांत घरातील सर्व वीज मीटर प्रीपेड करण्याचे निश्चित करण्यात आले आहे, असे केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाने म्हटले आहे.
या निर्णयामुळे ऊर्जा क्षेत्रात क्रांती घडेल, असा दावाही सरकारने केला आहे. वीज वहन आणि वितरणातील गळतीला थांबवण्यासाठी याचा फायदा होणार आहे आणि वीज निर्मिती, वहन आणि वितरण या क्षेत्रातील कंपन्यांना या निर्णयाचा उपयोग होईल. यामुळे ग्राहकांना एकदम मोठ्या रकमेचे वीज बील भरावे लागणार नाही. त्याचबरोबर पेपर बिलांतूनही त्यांची सुटका होईल.
स्मार्ट प्रीपेड मीटरचे फायदे काय?
स्मार्ट प्रीपेड मीटरमुळे ग्राहकांना एकदम महिन्याचे बील भरावे लागणार नाही. तर ते छोट्या छोट्या रकमेचे रिचार्ज करू शकतात. जशी गरज आहे, त्याप्रमाणे ते रिचार्ज करू शकतात.
स्मार्ट प्रीपेड मीटरमुळे रोजगार निर्मिती होईल. त्यामुळे देशातील तरुणांना रोजगार मिळेल.
स्मार्ट प्रीपेड मीटरमध्ये रिचार्ज करणे सोप्पे आहे.
देशातील सर्व नागरिकांना २४ तास वीज पुरवठा करण्याची हमी राज्य सरकारांनी दिली आहे. त्यासाठी सर्व राज्य सरकारांनी १ एप्रिल २०१९ पर्यंतची मुदत मागितली होती. येत्या काही महिन्यांतच ती संपत आहे. गरज पडल्यास या मुदतीत वाढ करून दिली जाऊ शकते, असेही या निवेदनात म्हटले आहे.