मुंबई: १९७५ मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी (Indira Gandhi) लावलेली आणीबाणी (Emergency) ही चूक होती, असं मोठं वक्तव्य त्यांचेच नातू आणि काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केलं आहे. अमेरिकेतील कॉर्नेल विद्यापीठातील प्राध्यापक कौशिक बासू यांच्याशी ते बोलत होते. यावेळी राहुल गांधींनी आणीबाणी, भाजप, (BJP) राष्ट्रीस स्वयंसेवक संघ, (RSS) काँग्रेस अध्यक्षपद या सर्व मुद्द्यांवर भाष्य केलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आणीबाणीबाबत जेव्हा राहुल गांधींना विचारण्यात आलं, तेव्हा ते थेट म्हणाले, की आणीबाणी ही इंदिरा गांधींची चूक होती, त्यावेळी जे घडलं, ते घडायला नको होतं, मात्र त्यावेळी जे घडलं आणि आता जे घडत आहे, त्यात फरक आहे. काँग्रेसने कधीच देशाची संस्थानात्मक चौकट मोडण्याचा प्रयत्न केला नाही.


पुढे ते म्हणाले, “की आम्हाला संसदेत बोलू दिलं जात नाही. न्यायव्यवस्थेकडून आता काही आशा नाही. संघ आणि भाजपकडे आर्थिक ताकद आहे. मणिपूरमध्ये राज्यपाल भाजपची मदत करत आहेत. पुद्दूचेरीमध्ये उपराज्यपालांनी अनेक विधेयकं मंजूर केली नाहीत, कारण ते संघाच्या जवळचे आहेत. काँग्रेसने कधीच अशाप्रकारे संस्थानांचा फायदा उचलण्याचा प्रयत्न केला नाही. मात्र मोदी सरकार लोकशाहीलाच धक्का देतेय.” 


राहुल गांधींच्या वक्तव्यानंतर भाजपनंही प्रतिक्रिया दिल्यात. केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नकवी म्हणालेत, “की राहुल गांधी माफी मागून थकतील, पण त्यांच्या चुकांची गणना संपणार नाही. ज्याप्रकारे त्यांनी लोकशाहीची हत्या केली, ते माफी लायक तरी आहे का?”



एकीकडे भाजप अशी प्रतिक्रिया देत असताना दुसरीकडे, महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी म्हटलंय, की हा राहुल गांधींच्या मनाचा मोठेपणा आहे. शिवाय राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिकांनी (Nawab Malik) भाजपलाच उलट सल्ला दिलाय, की भाजपनं गुजरात दंगल चूक असल्याचं मान्य करावं.


राहुल गांधींनी आणीबाणीसोबतच काँग्रेसमधील अंतर्गत मुद्द्यांनाही हात घातलाय. काँग्रेसमध्ये लोकशाही असावी, असं माझं वैयक्तिक मत आहे. काँग्रेसमधला मी असा पहिला व्यक्ती आहे, ज्याने लोकशाही पद्धतीने निवडणुका घेण्याला महत्व दिलंय.