३१ मे नंतर लॉकडाऊन वाढवू नका; सरकारी पॅनेल्सची केंद्राला शिफारस
कंटेन्मेंट झोनमधील निर्बंध आणखी कठोर करावेत.
नवी दिल्ली: ३१ मे नंतर केवळ कोरोनाचे हॉटस्पॉट वगळता देशातील अन्य भागांमध्ये ३१ मे नंतर लॉकडाऊन वाढवू नका, असा सल्ला सरकारी समित्यांनी मोदी सरकारला दिला आहे. आपत्कालीन वैद्यकीय सेवा, रुग्णालयांची उपलब्धता, विलगीकरण आणि क्वारंटाईन सुविधा या गोष्टींच्या नियोजनासाठी सरकारकडून काही समित्यांची स्थापन करण्यात आली होती.
देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ
यापैकी दोन समित्यांनी देशातील लॉकडाऊन कशाप्रकारे उठवायचा, याचा सविस्तर एक्झिट प्लॅन मोदी सरकारपुढे मांडल्याचे वृत्त 'इकॉनॉमिक टाईम्स'ने दिले आहे. यामध्ये कोरोनाचे हॉटस्पॉट वगळता इतर भागांमध्ये दैनंदिन व्यवहार सुरु करावेत, असे म्हटले आहे. मात्र, शाळा, महाविद्यालये आणि सिनेमागृह सुरु करण्यास या समित्यांनी नकार दर्शविला आहे. तसेच आंतरराष्ट्रीय विमानप्रवासही तुर्तास बंद ठेवावा, असेही या समितीचे म्हणणे आहे. मात्र, या गोष्टी वगळता लोकांवरील इतर निर्बंध उठवण्यात यावेत, असा प्रस्ताव या समित्यांनी मांडला आहे.
रेल्वे प्रवाशांनी इकडे लक्ष द्या; १ जूनपासून धावणाऱ्या गाड्या या स्थानकात थांबणार, यादी जाहीर
तसेच कोरोनाचे रुग्णांचे प्रमाण जास्त असलेल्या परिसरात अत्यंत आक्रमकपणे चाचण्या आणि कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करावे. येथील नियम आणखी कडक करण्यात यावेत, असेही समित्यांनी सांगितले आहे. दरम्यान, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी एक बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहादेखील उपस्थित असतील. त्याठिकाणी लॉकडाऊन वाढवायचा की नाही, याचा अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.
गेल्या २४ तासांत देशात कोरोनाचे ७,४६६ नवे रुग्ण आढळून आले. तर काल दिवसभरात १७५ जणांचा मृत्यू झाला. कोरोना रुग्णांच्या संख्येत एकाच दिवसात झालेली ही सर्वात मोठी वाढ आहे. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा आता १,६५,७९९ इतका झाला आहे.