`जैश`चा आणखी विस्तार; बालाकोटमध्ये दहशतवादी तळांच्या संख्येत वाढ
पुन्हा एकदा या भागात ...
मुंबई : साधारण वर्षभरापूर्वी भारतीय वायुदलाकडून करण्यात आलेल्या एका कारवाईमध्ये पाकव्याप्त काश्मीरमध्ये असणाऱ्या बालाकोट Balakot येथील दहशतवादी तळ उध्वस्त करण्यात आले होते. पण, आता मात्र पुन्हा एकदा या भागात जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे तळ सक्रिय झाले असून, या तळांची संख्या वाढत असल्याचं पाहण्यात आलं आहे. नाव जाहीर न करण्याच्या अटीवर गुप्तचर यंत्रणांच्या अधिकाऱ्यांकडून ही माहिती दिली आहे.
'हिंदुस्तान टाईम्स'च्या वृत्तानुसार, बालाकोट येथील दहशतवादी तळावर किमान दोन इमारती वाढल्या असून, त्या ठिकाणीही दहशतवादी सक्रिय झाल्याचं कळत आहे. मागील वर्षीत तत्कालीन सैन्यदलप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी बालाकोटचे दहशतवादी तळ पुन्हा सक्रिय झाल्याची माहिती दिली होती. सध्याच्या घडीला या तळांरव तांत्रिक बाबींवर अधिक लक्ष देण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.
पुलवामा हल्ल्यानंतर भारताकडून पाकिस्तानला हस्तांतरित करण्यात आलेल्या डोसियरमध्ये नमूद करण्यात आल्यानुसार बालाकोटमध्ये सहा एकर परिसरात दहशतवादी तळ पसरले असून, त्या ठिकाणी जवळपास ६०० दहशतवादी मावतील इतकी त्याची क्षमता असल्याचं सांगण्यात आलं होतं.
वाचा : ...म्हणून सैन्यदल वाहनांच्या चाकांना लावली जाते साखळी
अनुच्छेद ३७० रद्द केल्यापासून पाकिस्तानकडून नियंत्रण रेषेवर वारंवार गोळीबार आणि खुरापती करण्याचं सत्र सुरु ठेवण्यात आलं. किंबहुना हे सत्र मोठ्या प्रमाणात वाढलंही. जोरदार बर्फवृष्टीतही पाकिस्तानकडून या खुरापती सुरुच ठेवण्यात आल्या. ज्यामध्ये त्यांनी नियंत्रण रेषेवरुन मोर्चा आंतरराष्ट्रीय सीमेकडे वळवल्याचंही सांगण्यात आलं. शेजारी राष्ट्राकडून होणाऱ्या या कारवाया पाहता भारताकडून वेळोवेळी त्याचं चोख उत्तर देण्यात येत आहे.