नवी दिल्ली: समझौता ब्लास्ट प्रकरणी न्यायालयाने दिलेल्या निकालाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी काँग्रेसचा धारेवर धरले. काँग्रेसने राजकीय फायद्यासाठी हिंदू दहशतवादाचा बागुलबुवा उभा केला. समझौता ब्लास्ट प्रकरणात खोट्या पुराव्यांच्या आधारे खटला दाखल करण्यात आला. या खटल्यामुळे हिंदू समाजाची प्रतिमा मलिन झाली. त्यामुळे काँग्रेसने आता संपूर्ण हिंदू समाजाची माफी मागितली पाहिजे, अशी मागणी अरूण जेटली यांनी केली. समझौता ब्लास्ट प्रकरणात कोणतेही पुरावे सापडले नाहीत. कालपर्यंत हिंदू दहशतवादाच्या नावाने खडे फोडणारे लोक आता भक्तीभाव दाखवत आहेत, असेही जेटली यांनी म्हटले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हिंदू दहशतवादाची थिअरी सिद्ध करण्यासाठी चुकीच्या लोकांना खटल्यात गोवण्यात आले. या स्फोटात निरपराध लोकांचा बळी गेला. तरीही खरे मारेकरी अद्याप मोकाट आहेत. पंचकुलाच्या विशेष न्यायालयाने २० मार्चला समझौता खटल्यातील आरोपी स्वामी असीमानंद यांच्यासह चार जणांची निर्दोष मुक्तता केली होती. यावेळी न्यायमूर्ती जगदीप सिंग यांनी म्हटले की, या खटल्यातील अनेक महत्त्वपूर्ण पुरावे सरकारी पक्षाकडून सादर करण्यातच आले नाहीत. सरकारी पक्षाच्या बाजूने न राहण्याचा निर्णय घेतल्यानंतर अनेक महत्त्वाचे साक्षीदार न्यायालयात उलटतपासणीसाठी हजर झालेच नाहीत. तसेच सरकारी पक्षाने सादर केलेल्या पुराव्यांमध्ये अनेक त्रुटी असल्याने या दहशतवादी कृत्याचा छडा लागलाच नाही. दहशतवादाचा कोणताच धर्म नसतो. परंतु, सरतेशेवटी न्यायालय हे जनभावनेवर नव्हे तर पुराव्यांच्या आधारे निर्णय घेते, असे न्यायमूर्ती जगदीप सिंग यांनी निकालपत्रात नमूद केले. 



भारत-पाकिस्तान असा आठवड्यातून दोन दिवस प्रवास करणाऱ्या समझौता एक्सप्रेसमध्ये १८ फेब्रुवारी २००७ ला स्फोट झाला होता. ही ट्रेन दिल्लीहून लाहोरला चालली होती. हरियाणाच्या पानिपत येथे हा धमाका झाला. यामध्ये ६८ लोकांचा मृत्यू झाला तर १२ जण जखमी झाले. यामध्ये जीव गमावणारे बहुतांश नागरिक हे पाकिस्तानातील होते.