PF खात्यातून पैसे काढण्यासाठी EPFO चा नवा नियम
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी(ईपीएफओ) विभागाने पीएफमधून १० लाख रूपयांपेक्षा अधिक रक्कम काढण्यासाठी ऑनलाईन अर्ज अनिवार्य केलाय.
नवी दिल्ली : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी(ईपीएफओ) विभागाने पीएफमधून १० लाख रूपयांपेक्षा अधिक रक्कम काढण्यासाठी ऑनलाईन अर्ज अनिवार्य केलाय.
ऑनलाईन अर्ज अनिवार्य
ईपीएफओने पेपरलेस वर्क करण्याकडे एक पाऊल उलचले आहे. यासोबतच ईपीएफओने कर्मचारी पेंशन योजना(ईपीएस) १९९५ मधून पाच लाख रूपयांपेक्षा अधिक रक्कम काढण्यासाठीही ऑनलाईन अर्ज अनिवार्य केला आहे.
काय आहे नियम?
सध्या ईपीएफओ खातेदारांना ऑनलाईनसोबतच मॅन्युअल पद्धतीनेही पैसे काढण्याची परवानगी आहे. एका अधिका-यांनी सांगितले की, ‘केंद्रीय भविष्य निर्वाह निधी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली १७ जानेवारी २०१८ ला झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय. सर्वच कार्यालयांना आदेश देण्यात आले आहे की, पीएफमधून काढण्याची रक्कम १० लाखांपेक्षा अधिक असेल तर त्यासाठी केवळ ऑनलाईन अर्ज स्विकारला जावा.
व्याजदर कमी
याचप्रकारे कर्मचारी पेंशन योजनेमधून ५ लाखांपेक्षा जास्त रक्कम काढण्यासाठी केवळ ऑनलाईन अर्ज स्विकारला जाईल. ईपीएफओच्या खातेदारांची संख्या सहा कोटींपेक्षा जास्त आहे. याआधी २१ फेब्रुवारीला ईपीएफओने २०१७-१८ साठी पीएफच्या व्याज दरात घट करून ते ८.५५ टक्के करण्यात आला. याआधीच्या आर्थिक वर्षात हा व्याज दर ८.६५ टक्के होता.