`कुमारस्वामींनी शंभरदा आंघोळ केलीत तरी मोदींसारखे गोरे दिसणार नाहीत`
नरेंद्र मोदी दररोज उठल्यानंतर मेकअप करून चेहरा उजळवतात.
बंगळुरू: कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी यांनी शंभरदा आंघोळ केली तरी ते मोदींसारखे गोरे होणार नाहीत, असे वक्तव्य भाजप आमदार राजू कागे यांनी केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे कर्नाटकात नवा राजकीय वाद पेटण्याची शक्यता आहे. कुमारस्वामी यांनी काही दिवसांपूर्वी आमचा चेहरा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखा आकर्षक नसल्यामुळे प्रसारमाध्यमांकडून टेलिव्हिजनवर आमची भाषणे दाखवली जात नसल्याचे म्हटले होते. यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना भाजप आमदार राजू कागे यांनी म्हटले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गोरे आहेत आणि कुमारस्वामी काळे आहेत. मोदी दिवसातून दहावेळा पावडर लावतात, कपडे बदलतात, असे कुमारस्वामी बोलतात. मात्र, मुळात मोदी हे गोरे आणि दिसायला देखणे आहेत. त्यामुळे त्यांना हे सगळे शोभून दिसते. पण कुमारस्वामींनी दिवसातून शंभरदा आंघोळ केली तरी ते रेड्यासारखे काळेच दिसतील, असे राजू कागे यांनी म्हटले.
कुमारस्वामी यांनी काही दिवसांपूर्वी एका जाहीर कार्यक्रमात आमचा चेहरा मोदींसारखा आकर्षक नसल्यामुळे प्रसारमाध्यमांकडून टेलिव्हिजनवर आमची भाषणे दाखवली जात नसल्याचा आरोप केला होता. नरेंद्र मोदी दररोज उठल्यानंतर मेकअप करून चेहरा उजळवतात. हे सगळे सोपस्कार करून ते कॅमेऱ्यासमोर बसतात. मात्र, आम्ही सकाळी एकदा आंघोळ केल्यानंतर थेट दुसऱ्या दिवशी चेहरा धुतो. त्यामुळे कॅमेऱ्यासमोर आमचा चेहरा फारसा चांगला दिसत नाही. त्यामुळेच प्रसारमाध्यमांकडून टीव्हीवर फक्त मोदींचीच भाषणे दाखवली जातात, असे कुमारस्वामींनी सांगितले होते.
काही दिवसांपूर्वीच नरेंद्र मोदी यांनी चित्रदुर्ग येथील सभेत काँग्रेस आणि जेडीएस सरकारवर निशाणा साधला होता. हे दोन्ही पक्ष स्वत:च्या स्वार्थासाठी सरकार चालवत आहेत. त्याचे परिणाम सगळ्यांना दिसतच आहेत, असे मोदींनी म्हटले होते.