ईव्हीएम वाद । सर्वोच्च न्यायालयाने विरोधी पक्षांची मागणी फेटाळली
लोकसभा निवडणुकीचे निकाल २३ मे रोजी लागणार आहेत. त्याआधी निवडणूक आणि ईव्हीएम वाद उभा राहिला आहे.
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीचे निकाल २३ मे रोजी लागणार आहेत. त्याआधी देशातील जवळपास २२ छोट्या-मोठ्या राजकीय पक्षांनी ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. त्यामुळे निवडणूक आणि ईव्हीएम वाद उभा राहिला आहे. त्यासाठी हे राजकीय पक्षांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने या राजकीय पक्षांची मागणी फेटाळून लावली.
लोकसभा निवडणुकांच्या निकालाआधी ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट यंत्रांच्या मुद्द्यावरून काँग्रेस, समाजवादी पक्ष, बहुजन समाजवादी पार्टी, तृणमूल काँग्रेससह २२ विरोधी पक्षांनी मंगळवारी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. ईव्हीएम सुरक्षित असल्याचे सांगत निवडणूक आयोगाने या विरोधी पक्षांना आश्वस्त केले.
ईव्हीएमशी छेडछाड झाली तर...
२३ मे रोजी मतमोजणी सुरू होण्यापूर्वी प्रत्येक मतदारसंघातल्या कोणत्याही पाच मतदान केंद्रांवरील व्हीव्हीपॅटशी ईव्हीएमची पडताळणी करण्याची मागणी करण्यात आली आहे. मात्र, कुठेही ईव्हीएमशी छेडछाड केल्याचे स्पष्ट झाल्यात त्या मतदारसंघातल्या सर्व १०० टक्के व्हीव्हीपॅट स्लीप्स ईव्हीएमशी पडताळून पाहा, अशी मागणी विरोधी पक्षांनी निवडणूक आयोगाकडे केल्याचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी सांगितले.
काही तक्रार असेल तर येथे संपर्क करा
दरम्यान, ईव्हीएममध्ये कोणतेही फेरफार झाले नसल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले. स्ट्राँगरुममध्ये सर्व ईव्हीएम पूर्णपणे सुरक्षित आहेत, असे आयोगाने स्पष्ट केले आहे. तर दुसरीकडे निवडणूक आयोगाने मतदान झालेल्या ईव्हीएम संबंधित तक्रारींचे परीक्षण करण्यासाठी नवी दिल्लीतील निर्वाचन सदन येथे २४ तास ईव्हीएम कंट्रोल रूमची स्थापना केली. ईव्हीएमशी संबंधित मोजणी करताना कोणतीही तक्रार नियंत्रण कक्षाच्या 011 23052123 या क्रमांकावर करण्याची विनंती करण्यात आली आहे.