नवी दिल्ली : कोरोना वायरसच्या विरोधात लढण्यासाठी संपूर्ण देश २१ दिवस लॉकडाऊन करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. हे ऐतिहासिक युद्ध असल्याचे सांगत माजी अर्थमंत्री पी.चिदंबरम यांनी सरकारला १० कलमी कार्यक्रम सुचवला आहे. लॉकडाऊनच्या स्थितीत सर्वसामान्यांची आर्थिक स्थिती अधिक खालावते. हे पाहता पैसे आणि किराणा तात्काळ पोहोचल्यास ते घरातून बाहेर येणार नाहीत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पी.चिदंबरम यांनी लॉकडाऊनच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. कोरोनाच्या विरोधात युद्ध सुरु असून सर्व जनता सैन्य तर पंतप्रधान हे सेनापती आहेत. त्यामुळे पंतप्रधान, केंद्र आणि राज्य सरकारच्या सुचनांचे पालन करणं हे आपलं कर्तव्य असल्याचे चिदंबरम म्हणाले. घरातून बाहेर न पडण्याची युद्धघोषणा योग्यच आहे. पण आता २१ दिवसांची योजना देखील आपल्याला करावी लागेल. यामुळे सर्वसामांन्यांच्या दैनंदिन जिवनात अडथळा येणार नाही.



प्रधानमंत्री किसान योजनेची रक्कम दुप्पट करुन ६ हजाराची रक्कम १२ हजारांपर्यंत न्यायला हवी. ही अतिरिक्त रक्कम लाभार्थ्याच्या खात्यात तात्काळ टाकायला हवी.पट्ट्यावर शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना देखील यामध्ये सहभागी करायला हवे. मनरेगाच्या अंतर्गत नोंदणीकृत मजुरांच्या खात्यामध्ये तात्काळ ३ हजार रुपयांची रक्कम टाकायला हवी. शहरी क्षेत्रातील गरीबांना मदत पोहोचवण्यासाठी जनधन बॅंकेमध्ये अकाऊंट असलेल्या खातेधारकांना ६ हजार रुपये दिले जावेत. 



२१ दिवसांत १० किलो तांदुळ मोफत 


शिधा धारकांना देखील २१ दिवसांमध्ये १० किलो तांदुळ किंवा गहू मोफत घरपोच दिले जावेत. कोणत्याही नोंदणीकृत कंपनीने कर्मचाऱ्यांमध्ये कपात करु नये. अशा संकटात १ महिन्याचा पगार सरकार देईल याची शाश्वती द्यायला हवी.