Poll of Poll 2023 : लोकसभेची सेमीफायनल म्हणून पाहिल्या जाणाऱ्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसाठी येत्या 3 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, तेलंगना आणि मिझोराम या  पाच राज्यात कोणाची सत्ता येणार हे दोन दिवसात स्पष्ट होईल. पण त्याधी एक्झिट पोलचे आकडे समोर आले आहेत. पोल ऑफ पोलच्या अंदाजानुसार राजस्थान आणि मध्य प्रदेशात भाजपची सत्ता येईल तर छत्तीसगड आणि तेलंगणामध्ये काँग्रेसला बहुमत मिळण्याची शक्यता आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मध्यप्रदेशमध्ये भाजपाची सत्ता कायम
मध्य प्रदेशात भाजपचीच सत्ता येणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. शिवराजसिंह चौहान यांची 18 वर्षांनंतरही जादू कायम असल्याचं दिसतंय. तर काँग्रेसला सत्तेसाठी आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लगाण्याचा अंदाज आहे. पोल ऑफ पोलच्या आकडेवारीनुसार भाजपला 136, काँग्रेसला 91 तर तीन जागा इतरांना मिळण्याची शक्यता आहे. मध्य प्रदेशमध्ये 230 जागा आहेत. 2018 विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने 114 जागा पटकावल्या तर भाजपाला 109 जागांवर समाधान मानावं लागलं. काँग्रेसने बसपा आणि सपाबरोबर युती करत सत्ता स्थापन केली. पण ज्योतिरादित्य शिंदे यांनी बंडखोरी करत 22 आमदारांसह भाजपमध्ये प्रवेश केला आणि भाजपने सत्ता स्थापन केली. शिवराजसिंह चौहान चौथ्यांदा मुख्यमंत्री झाले.



राजस्थानात सत्तांतर
राजस्थानच्या महाएक्झिट पोलमध्ये सत्तांतराचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. काँग्रेसच्या अशोक गेहलोत यांची सत्ता जाणार असल्याची शक्यता पोल ऑफ पोलमध्ये व्यक्त करण्यात आलीय. भाजप 96 ते 109, काँग्रेस 81 ते 95  आणि इतर 10 ते 18 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राजस्थानमध्ये गेल्या 25 वर्षांपासून प्रत्येक वेळी सरकार बदलण्याची परंपरा आहे. राजस्थानमध्ये 200 विधानसभेच्या 200 जागा आहेत. 2018 विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने 99 जागा मिळवल्या आणि अशोक गेहलोत मुख्यमंत्री झाले.



छत्तीसगढमध्ये काँग्रेसची सत्ता
छत्तीसगडमध्ये पोल ऑफ पोलनुसार काँग्रेसला सत्ता मिळण्याचा अंदाज आहे..काँग्रेसला 42 ते 52 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर भाजपला 35 ते 45 जागा मिळण्याची शक्यता आहे. छत्तीसगडमध्ये 90 जागा आहेत. यावेळी दोन टप्प्यात मतदान झालं. पहिल्या टप्प्यात 20 तर दुसऱ्या टप्प्यात 70 जागांसाठी मतदान झालं. 



तेलंगणात काँग्रेसची सत्ता
एक्झीट पोलने वर्तवलेल्या अंदाजानुसार तेलंगणात सत्तेच्या चाव्या काँग्रेसकडे जाणार असल्याचं दिसतंय. सत्तेत असलेल्या बीआरएसलाही इथें मोठा  धक्का बसण्याची शक्यता आहे. तेलंगणा विधानसभेच्या 119 जागांसाठी मतदान झालं. इथं काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळण्याची चिन्ह आहेत. गेल्या दोन विधानसभा निवडणुकीत तेलंगणात बीआरएसची सत्ता होती. पण यावेळी के चंद्रशेखर राव यांच्या बीआरएसला धक्का बसण्याची शक्यता आहे. तेलंगणात काँग्रेस आणि बीआरएसमध्ये चुरशीची लढत रंगताना दिसत आहे. AIMIM ला 6 ते 8 जागा मिळण्याची शक्यताही वर्तवण्यात आली असून ते किंगमेकरही ठरू शकतात. 



मिझोरममध्ये एमएनएफची सत्ता
मिझोराममध्ये मिझो नॅशनल फ्रंट बहुमताचा आकडा गाठू शकते, असा अंदाज आहे. मिझोराममध्ये एकूण 40 जागा असून यापैकी 28 जागा एकट्या एमएनएफला मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर काँग्रेस आणि भाजपाला सिंगल आकड्यांवर समाधान मानावं लागेल.