भोपाळ: काँग्रेसच्या काळात तुरुंगात असताना माझा प्रचंड छळ झाला. त्यामुळे सध्या मला अनेक शारीरिक व्याधींना तोंड द्यावे लागत असल्याचे वक्तव्य भाजप खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी केले. आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त भोपाळमधील भाजप मुख्यालयात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमानंतर त्या प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या. यावेळी त्यांनी म्हटले की, काँग्रेसच्या राजवटीत मी नऊ वर्षे तुरुंगात होते. तुरुंगात झालेल्या छळादरम्यान मला अनेक दुखापती झाल्या होत्या. तसेच अनेक जुन्या व्याधीही बळावल्या. या सगळ्यामुळे माझ्या डोळ्यांचा रेटिना आणि मेंदूत सूज आणि पू  तयार झाला. त्यामुळे मला उजव्या डोळ्याने भुरकट दिसते. तर डाव्या डोळ्याने मला काहीच दिसत नाही. हे सगळे काँग्रेसच्या काळातील छळामुळे झाल्याचा आरोप साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी केला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

VIDEO: तुरुंगातील अत्याचारांबद्दल सांगताना साध्वी प्रज्ञांना भर सभेत रडू कोसळले

यावेळी साध्वी प्रज्ञा यांनी कोरोनाच्या संकटकाळात आपल्या मतदारसंघात हजर नसल्याच्या विरोधकांच्या आरोपांनाही प्रत्युत्तर दिले. लॉकडाऊनच्या निर्बंधांमुळे मी दिल्लीत अडकून पडले होते. मला व माझ्या कर्मचाऱ्यांना भोपाळला परत येण्यासाठी प्रवासाची तिकीटे उपलब्ध होत नव्हती, असे स्पष्टीकरण साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी दिले. 


भाजप उमेदवाराचे शहीद करकरेंबाबत संतापजनक वक्तव्य


दरम्यान, काँग्रेस नेते पी.सी. शर्मा यांनी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचे सर्व आरोप फेटाळून लावले. आम्ही महिलांचा आदर करतो. मध्य प्रदेशात १५ वर्ष आणि केंद्रात सहा वर्ष भाजपचे सरकार असताना काँग्रेस साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचा छळ कसा करु शकते? जनतेमध्ये संभ्रम पसरवण्यासाठी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर हे आरोप करत असल्याचे पी.सी. शर्मा यांनी सांगितले.